पुणे – वजन अल्प करण्याच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या २ वर्षांपासून १ अभियंता महिला अंथरुणाला खिळून आहे. या प्रकरणी डॉ. प्रशांत यादव आणि डॉ. स्वप्नील नागे यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भात महिलेच्या पतीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
तक्रारदाराच्या पत्नीने वजन अल्प करण्यासाठी एरंडवणे भागातील ‘डिझायनर क्लिनिक’मध्ये १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘लिपोसक्शन’ शस्त्रक्रिया करून घेतली. या वेळी तिच्या शरिरातील साडेचार लिटर मेद (फॅट) काढण्यात आले; मात्र शस्त्रक्रियेनंतर महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. खासगी रुग्णालयात त्या ३ महिने उपचार घेत होत्या; परंतु उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने घरी नेण्यात आले. तेव्हापासून त्या अंथरुणाला खिळून असून काही बोलत नाही. केवळती फक्त डोळे उघडझाप करत असल्याचे पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.