थोडक्यात महत्त्वाचे !

भिवंडी येथे बिबट्याला पकडले !

ठाणे – भिवंडी येथील पडघा भागातील गोदाम क्षेत्रामध्ये नर बिबट्या आढळला होता. मध्यरात्री या बिबट्याला पकडण्यात आले. बिबट्या ७ ते ८ वर्षांचा असून वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवत आहे. त्याला पकडण्यासाठी ७ – ८ घंटे वन विभागाने प्रयत्न केले. बिबट्याच्या समोर पिंजर्‍यामध्ये कोंबडी ठेवण्यात आली आणि तिच्या शिकारीसाठी बिबट्या पिंजर्‍यात गेल्याने त्यात तो अडकला.


बेस्टला धडकून तरुणाचा मृत्यू !

मुंबई – गोवंडी येथील शिवाजीनगर जंक्शनजवळ बेस्ट बसच्या अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बेस्ट बस शिवाजीनगर येथून कुर्ल्याच्या दिशेने जात असतांना दुचाकीस्वार बसच्या मागील बाजूला धडकला. त्यानंतर चालकाला रुग्णालयात नेण्यात आले; पण तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला.


पूनम चेंबरला आग !

मुंबई – वरळीतील पूनम चेंबरमध्ये १५ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता आग लागली. सात मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर ही आग लागली होती. अग्नीशमनदलाने आग विझवण्याचे काम हाती घेतले. या इमारतीला काचेची तावदाने असून त्यातून धूर बाहेर पडत होता.


भटका श्वान आणि मांजर चावलेल्या तरुणाचा मृत्यू !

कल्याण – येथील पश्चिमेतील गोल्डन पार्क भागातील बेतुरकरपाडा येथे रहाणार्‍या २७ वर्षांच्या तरुणाला २ महिन्यांपूर्वी भटका श्वान चावला होता. त्यानंतर लगेच त्याला मांजरही चावली; पण तरुणाने रुग्णालयात न जाता त्रास अंगावर काढले. त्याला अलीकडे त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला.


वाळू व्यावसायिकांच्या बोटी नष्ट केल्या !

कल्याण – भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे, कशेळी, आलिमघर खाडी भागात दिवसरात्र बेकायदा वाळू उपसा करणार्‍या वाळू व्यावसायिकांच्या १८ लाख रुपयांच्या बोटी, सक्शन पंप असे साहित्य भिवंडी महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केले. अचानक झालेल्या या कारवाईने वाळू व्यावसायिक आणि कामगार यांची पळापळ झाली.


हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर धाड !

८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

पुणे – हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने धाड घातली. या कारवाईत पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला, तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी विकास हिंगणे, संतोष देशमुख, अशोक करंजीकर, कुमार अलकुंटे, विजय तुपे यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.