पुणे जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू !

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) – पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य समवेत नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने समवेत नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू समवेत नेणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढार्‍यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजवणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आणि ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे आणि त्याविषयी अनुमती आहे त्यांना लागू होणार नाही.