‘सेल्फी’ काढण्याच्या नादात युवती दरीत कोसळली !

सातारा, ६ ऑगस्ट (वार्ता.) – सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोलणे येथील ‘मंकी पॉईंट’ परिसरात ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात एक युवती १०० फूट दरीत कोसळली. ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि सातारा तालुका पोलिसांनी तातडीने बचाव कार्य राबवून युवतीचे प्राण वाचवले. (तरुण-तरुणी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेल्फी काढतात. यामुळे पोलीस आणि प्रशासन यांसह सर्वांनाच अडचणीत आणतात, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे ! – संपादक)

सज्जनगड घाटामध्ये बोरणे येथील ‘मंकी पॉईंट’ परिसरात काहीजण खासगी वाहनातून पर्यटनासाठी आले होते. यातील एक युवती सेल्फी काढण्याच्या नादात १०० फूट दरीमध्ये कोसळली. येणार्‍या जाणार्‍यांनी याची माहिती ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला दिली. पुढे सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनाही याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अत्यंत गतीने ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने बचावकार्य चालू केले. वेळेत बचाव कार्य चालू केल्यामुळे युवतीचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. युवतीला मानसिक धक्का बसल्यामुळे ती प्रचंड घाबरलेली होती. तिला अधिक उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

घाटातील प्रवासामध्ये पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, तसेच रस्त्यावर थांबून गाडीतील टेप लावून त्याच्यावर नृत्य करू नये. अतीउत्साही पर्यटकांनी स्वतःच्या उत्साहाला आवर घालून इतरांची गैरसोय टाळावी, असे आवाहन सातारा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.