अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांसह ९ जणांना नोटीस !

पिंपरी (जिल्हा पुणे) – शहरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, हॉटेल, पब आणि बार यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त, तसेच ६ क्षेत्रीय अधिकारी अन् २ बीट निरीक्षक अशा ९ जणांना नोटिसा दिल्या आहेत. नदीकाठच्या अतिक्रमणकर्त्यांना अतिक्रमणे काढून घेण्याच्या संदर्भात महापालिका प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. नदीकाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सतत झालेल्या पावसाने नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. ५ सहस्रांहून अधिक नागरिकांचे स्थलांतरही करावे लागले. त्यामुळे शहरातील विविध भागांत असणार्‍या अनधिकृत अतिक्रमणांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कानाडोळा केल्याने नोटीस बजावल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली. शहरातील कोणत्या भागात अतिक्रमण झाले आहे ?  किती अतिक्रमणकर्त्यांना नोटिसा दिल्या ?, किती जणांवर कारवाई केली ? याची माहिती व्हावी यासाठी महापालिका स्वतंत्र उपयोजन (ॲप) विकसित करत आहे. शहरातील विविध भागांत ६६ पूर्णतः, तर २८ अंशतः अनधिकृत हॉटेल, पब आणि बार आहेत, तसेच ५० वर्षे जुनी हॉटेलही आहेत. त्यामुळे अशा हॉटेलवरील कारवाईचा निर्णय आयुक्तांशी चर्चा करून घेतला जाईल, असेही जांभळे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका :

  • अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांनी कारवाई न करण्यासाठी पैसे घेतले आहेत का ? याची शहानिशा व्हायला हवी !
  • शहरात अतिक्रमणे होईपर्यंत संबंधित प्रशासकीय अधिकारी झोपा काढत असतात का ?