Britain Knife Attack : ब्रिटनमध्ये १७ वर्षीय युवकाकडून मुलांवर चाकूद्वारे आक्रमण : २ ठार, ११ घायाळ

  • पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी व्यक्त केला शोक

  • आक्रमणाचे कारण अद्याप अस्पष्ट

घटनास्थळ

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील लिव्हरपूल येथील साऊथपोर्टमध्ये २९ जुलैच्या सायंकाळी घडलेल्या एका घटनेत एका १७ वर्षीय युवकाने चाकूद्वारे आक्रमण केले. यात २ मुलांचा मृत्यू झाला, तर ११ लोक घायाळ झाले. घायाळांवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्यामध्येही बहुतांश लहान मुले आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या घटनेला ‘भयानक’ आणि ‘धक्कादायक’ म्हटले असून या घटनेचा निषेध केला

हे आक्रमण मुलांच्या नृत्य शिबिरात झाले. पोलिसांनी आक्रमण करणार्‍याला अटक केली आहे. या आक्रणामागील त्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नसला, तरी पोलिसांनी हे ‘जिहादी आतंकवादी आक्रमण’ असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

१. ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान केयर स्टॉर्मर यांनी साऊथपोर्टमधील या घटनेला ‘भयानक’ आणि ‘धक्कादायक’ म्हटले असून या घटनेचा निषेध केला आहे.

२. पंतप्रधानांव्यतिरिक्त ब्रिटनचे गृहमंत्री कूपर आणि लिव्हरपूलचे महापौर स्टीव्ह रॉथेरम यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

३. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुले नृत्य आणि योग कार्यक्रमासाठी कार्यशाळेत आली होती. थोड्या वेळाने मला अचानक ८ ते १० मुले रक्तबंबाळ अवस्थेत पळतांना दिसली. आत काय झाले ?, ते कळू शकले नाही.

४. घटनास्थळाजवळ रहाणारे कॉलिन पेरी यांनी सांगितले की, आक्रमण करणारा बहुधा हिरवा सदरा आणि ‘फेस मास्क’ घातलेला होता.

५. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्रमणकर्ता ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील रहिवासी आहे.