महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शीव (सायन) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !
मुंबई – गुरु-शिष्य परंपरा ही केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित आहे, असे नाही, तर संगीत, कला, नृत्य, वेदाध्यायन आणि युद्धकला अशा वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहे. या गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेच्या कार्यातही योगदान दिले आहे. सर्वोच्च आनंद केवळ साधना करूनच मिळू शकतो. यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अधिकाधिक साधना करण्याचा संकल्प करा, असे आवाहन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या डॉ. (सौ.) सायली यादव यांनी केले. मुंबईमधील शीव (सायन) येथील गोकुळ सभागृहात २१ जुलै या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित इंग्रजी भाषिक गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘गुरु-शिष्य परंपरा आणि सनातन धर्माची वैज्ञानिकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी मुंबई येथील सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ञ डॉ. अनुज श्रीवास्तव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. (सौ.) सायली यादव पुढे म्हणाल्या, ‘‘भारताची खरी प्रगती व्हायची असेल, तर भारताने प्राचीन शिक्षणपद्धतीचे संवर्धन करणे अनिवार्य आहे. आज सर्वव्यापी अध्यात्मशास्त्राचे, तसेच ईश्वरप्राप्तीचे शिक्षण देणारे एकही विद्यापीठ जगात नाही. ही उणीव दूर करण्यासाठी आणि जगभर सनातन धर्माच्या प्रसारासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा पाया रचला आहे. सनातन संस्कृती आणि अध्यात्म यांवर आधारित अभ्यासक्रम सिद्ध करून तो शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये घेण्याच्या दृष्टीनेही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रयत्न चालू आहेत. फक्त भौतिक सुख मिळवणे हे मनुष्यजन्माचे ध्येय नसून सुख-दुःखापलीकडील आनंद म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुरूंच्या मार्गदर्शनानेच हे शक्य होणार आहे.’
सौ. स्मिता पाणिग्रही यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे जगभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी सांगितले. या वेळी हिंदु धर्माची महानता, साधना, तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधनकार्य या विषयांवर लघुपट दाखवण्यात आले. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. ठाणे येथील ‘पितांबरी’ उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्यासह मुंबई आणि मुंबई उपनगरातील जिज्ञासू या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिज्ञासूंच्या प्रश्नोत्तर सत्रानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ञ डॉ. अनुज श्रीवास्तव यावेळी म्हणाले, ‘‘आपल्या गुरु-शिष्य परंपरेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. आपण सर्वोच्च शक्ती असलेल्या परमेश्वराची लेकरे आहोत, हे विसरलो आहोत. सध्या ‘मन आणि आत्मा’ याविषयी कुणी सांगत नाही; म्हणूनच आज जगभरात मानसिक रोगांचे प्रमाण वाढत आहे. आपल्यातील परमात्मा तुम्हाला योग्य गुरूंच्या माध्यमातून पुढील दिशा देईल. तीव्र इच्छाशक्तीच तुम्हाला योग्य गुरूंपर्यंत पोचवून जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सोडवेल.’’ |