भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता, भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार, अखंड भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आजही देशाला भोवणे अन् स्वाभिमानी सत्तेने देशावर राज्य केल्यास काय झाले असते ?’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक २३)

या आधीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक का : https://sanatanprabhat.org/marathi/814708.html

प्रकरण ४

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

८. धर्माचा मूळ आधार ठेचला गेला !

मुसलमानांना मात्र सहजासहजी मुसलमान राष्ट्र होण्यासाठी भारताचा एक तुकडा तोडून देण्यात आला. रक्ताचा थेंब न सांडता पाकिस्तान झाले आणि रक्ताचे पाट वाहूनही हिंदुस्थान जन्माला आला नाही. आम्हाला हिंदु धर्माला स्थान नसलेला आणि धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा भारत लाभला. या भारतात लोकशाहीच्या गठ्ठा मताच्या महत्त्वापायी मुसलमान अनुनयाची अहमहमिका चालू झाली. ‘धर्माच्या आधारावर मते मागू नयेत’, अशा प्रकारच्या बंधनांनी हिंदु बहुमताच्या ‘धर्म’ या मूळ आधारालाच ठेचून टाकण्यात आले.

९. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्वाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न !

Democracy is a form of Government established by the people for the people and of the people. याचा अर्थ लोकशाही म्हणजे लोकांकडून, लोकांसाठी आणि लोकांचे शासन म्हणून स्थापन झालेले असते. त्यात लोक म्हणजे बहुमत. हिंदुस्थानात हिंदु प्रचंड बहुमतात आहेत. त्यातील एक वर्ग दलित म्हणून सवर्णांविषयी विविध प्रकारे तिरस्कार निर्माण करून हिंदु समाजापासून दूर काढण्यात आला. मुसलमान तर पहिल्यापासूनच हिंदूंपासून पूर्णपणे फटकून वागत आहेत. दुर्दैवाने हिंदु समाज अज्ञानापायी स्वत्वाविषयी अजिबात जागृत नाही. त्याला जागृत करणे, हे ‘जातीय प्रचार करण्याचे कारस्थान’, असे ठरवण्यात आल्यामुळे भारतीय लोकशाही ही भारतातील हिंदूंच्या मुळावर आली आहे, ही वस्तूस्थिती आहे. भारतातील सुशिक्षित आणि प्रगत उच्चवर्णियांत धर्मद्रोही, विचारवंत (?), समाजवादी यांनी प्रचारसाधने आपल्या हाती मिळवून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्वाचा द्वेष पसरवण्याचा आणि हिंदु धार्मिकतेला अंधश्रद्धेचे आवरण घालण्याचा जोरदार खटाटोप चालवला आहे.

१०. समाजवाद्यांचा आत्मघातकी कार्यक्रम

‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उ‌द्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे; मात्र त्यांची ही घोषणा गर्वाने स्वतःला मुसलमान वा ख्रिस्ती म्हणवणार्‍या समाजापुढे अर्थहीन आणि प्रभावहीन आहे, म्हणजेच कळत-नकळत हिंदुघाताचा कार्यक्रम हा समाजवाद्यांचा आत्मघातकी कार्यक्रम आहे. वैयक्तिकदृष्ट्या धार्मिक असणारे लोकही ‘सार्वजनिक क्षेत्रात धर्म आणू नये’, असे म्हणतात. देवेगौडा किंवा लालू यादव आपल्या घरात धार्मिक आहेत. देवेगौडांनी मध्यंतरी यज्ञ केला होता. लालू यादवांकडे पूजा चालू असते; पण हे लोक हिंदूंचे हित जपणार्‍या भाजपचे वैरी आहेत. शिवसेना ही उघडपणे आम हिंदुहितकारी आहे; पण तिचे शत्रू हे समाजवादी आहेत.

११. काँग्रेसी सत्तेची देशाला असलेली देणगी (?) !

महाराष्ट्रातील युती सरकारच्या स्थापनेपासून त्यांच्या विरुद्ध लोकमत निर्माण करण्याचे महत्कार्य महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रांनी मोठ्या जोमाने चालवले. प्रतिदिनच्या वृत्तपत्रांतील मथळे पहा ! ‘लोकमानसा’त अत्यंत भ्रष्ट, दुष्ट आणि लुटारू असे हे महाराष्ट्र सरकार असल्याचे प्रचारिले जात असे. भ्रष्टाचाराचा राक्षस, लाचलुचपत आणि वशिलेबाजीची बजबजपुरी, पोलिसांवर राजकारण्यांचे दबाव, गुंड आणि राजकारणी यांचे संबंध ही गेल्या ६० वर्षांतील काँग्रेसी सत्तेची या देशाला देणगी आहे, हे कोण सुबुद्ध माणूस नाकारू शकेल ?

१२. पैशांसाठीचा सभ्य मार्ग (?) ते भ्रष्टाचार !

शिवसेना-भाजपसारख्या पक्षांकडून मात्र तशी अपेक्षा नाही; परंतु महागाईच्या कठीण काळात लोकशाहीत स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांना प्रचंड पैसा लागतो. हा पैसा आणण्याचा कोणता सभ्य मार्ग आज उपलब्ध आहे ? असे सभ्य मार्ग किती पैसा मिळवून देऊ शकतात ? यातूनच मुळात भ्रष्टाचार उत्पन्न झाला. नेहरूंच्या काळापासून हा भ्रष्टाचार होता आणि तो फोफावतही होता. मोठमोठे उद्योगपती काँग्रेसला पोसत होते आणि आपले आर्थिक व्यवहार साधून घेत होते.

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या पुढील लेख वाचण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/817984.html