समर्पितभावाने श्री गुरूंचे आज्ञापालन करणारे शिष्य आर्य समाजाचे संस्थापक ऋषि दयानंद सरस्वती !    

‘ऋषि दयानंद सरस्वती’

१. श्री गुरूंनी शिष्य दयानंदला आदल्या दिवशी शिकवलेल्या पाठाविषयी विचारणे आणि शिष्य दयानंदला ते सांगता न येणे

‘एकदा दंडीस्वामी श्री विरजानंदजींनी त्यांचा शिष्य दयानंद याला आदल्या दिवशी शिकवलेल्या पाठाविषयी विचारले; पण तो काहीच न बोलता शांत राहिला. तेव्हा त्यांच्यामध्ये पुढील संवाद झाला.

गुरुजी : दयानंद, तू कालचा पाठ का सांगत नाहीस ?

बालक दयानंद (दबलेल्या आवाजात) : गुरुजी, मला क्षमा करा. कालचा पाठ माझ्या लक्षात नाही.

गुरुजी : दयानंद, काल पाठ शिकवतांना निश्चितच तुझे मन दुसरीकडे भरकटले असेल; म्हणून तुला तो चांगल्या प्रकारे समजला नाही. आपण जो विषय योग्यप्रकारे समजून शिकत नाही, तो आपल्याला लवकर पाठ होत नाही आणि आपण तो विसरूनही जातो. आपण जे कार्य करतो, त्यात आपले पूर्ण लक्ष असले पाहिजे.

२. श्री गुरूंनी त्याला पाठ आठवून सांगेपर्यंत पुढचे शिक्षण बंद केल्याची शिक्षा देणे आणि दयानंदने पाठ पुन्हा आठवत नाही, तोपर्यंत अन्न-पाणी अन् झोप न घेण्याचे प्रायश्चित्त घेणे

दयानंद : होय गुरुजी, काल माझ्याकडून ही चूक झाली होती. यासाठी तुम्ही मला शिक्षा द्या. मी भविष्यात असा निष्काळजीपणा कधीच करणार नाही.

गुरुजी : ‘जोपर्यंत तू विसरलेला पाठ आठवून सांगत नाहीस, तोपर्यंत तुझे पुढचे शिक्षण बंद असेल’, हीच तुझ्या या चुकीची शिक्षा आहे.

दयानंद : हा विसरलेला पाठ मला पुन्हा आठवत नाही, तोपर्यंत मी अन्न-पाणी ग्रहण करणार नाही आणि झोपणारही नाही. मी तो पाठ केल्याविना आपल्या चरणांचे दर्शनही घेणार नाही.

३. दयानंदचा श्री गुरूंप्रती असलेला समर्पणभाव !

३ अ. दयानंदने ध्यानात श्री गुरूंचे स्मरण करून आदल्या दिवशी श्री गुरूंनी शिकवलेल्या पाठाचे चिंतन करणे : ही कठीण प्रतिज्ञा करून दयानंद तेथून बाहेर पडला. तेव्हा दंडीस्वामींच्या हृदयात त्यांच्या लाडक्या शिष्याप्रती करुणेचा अपार सागर उचंबळत होता. गुरुजींचा निरोप घेऊन दयानंद एका झाडाखाली जाऊन बसला. त्याने डोळे बंद करून पाठाकडे मन एकाग्र केले. गुरुजींचे स्मरण करून तो ध्यानात आदल्या दिवशी गुरुजींकडून धडा शिकतांना असलेली स्थिती आठवू लागला.

३ आ. ध्यानावस्थेत दयानंदला श्री गुरूंचा आवाज स्पष्टपणे ऐकू येणे आणि त्याला संपूर्ण पाठाचे स्मरण होणे : तो चिंतन करू लागला, ‘काल मी नदीत स्नान केल्यावर गुरुजींच्या स्नानासाठी पाणी भरून आणले होते. मग मी गुरुदेवांना साष्टांग नमस्कार करून त्यांचा शुभाशीर्वाद घेतला होता. तेव्हा गुरुजींनी मला आदल्या दिवशीचा पाठ विचारला होता. ध्यान करतांना दयानंद आदल्या दिवशीच्या या स्थितीपर्यंत पोचला आणि त्याच क्षणी त्याला वाटले, ‘गुरुजी साक्षात् त्यांच्या आसनावर विराजमान आहेत आणि ते कालचा पाठ शिकवत आहेत.’ त्याला गुरुदेवांचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला आणि कालचा पूर्ण पाठ त्याच्या डोळ्यांपुढून सरकला. पाठ संपल्यावर त्याने पाहिले, ‘ज्या प्रकारे त्याच्या बुद्धीचा अंधकार दूर झाला, अगदी त्याच प्रकारे रात्रीचा काळोख दूर झाला असून पूर्व दिशेला उजाडत आहे.’ दयानंद स्नान करून गुरुदर्शनासाठी गेला. तेव्हा गुरुजींनी त्याला विचारले, ‘‘बोल दयानंद, तुला कालचा पाठ आठवला का ?’’ दयानंद कृतज्ञतेच्या स्वरात म्हणाला, ‘‘गुरुदेव, आपल्या कृपेने मला सर्वकाही आठवले.’’ गुरुजींनी प्रसन्न होऊन त्यांच्या लाडक्या शिष्याला हृदयाशी कवटाळले.

गुरूंप्रती असा समर्पणभाव असणारा हाच बालक पुढे आर्य समाजाचे संस्थापक ‘ऋषि दयानंद सरस्वती’ या नावाने सुप्रसिद्ध झाला.’

(साभार : मासिक ‘लोक कल्याण सेतू’, जून २०१७)