‘चेंबूर (मुंबई) येथील भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. त्यांच्या समवेत सेवेत असतांना माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. (पू. प्रा. सु.ग. शेवडे यांना सर्व जण प्रेमाने ‘पू. आबा’ म्हणतात. – संकलक)
भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! |
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पू. शेवडे यांचा भाव१. प.पू. डॉक्टरांचे कार्य अवतारी आणि ईश्वरी आहे ! : ते म्हणतात, ‘‘एखाद्याला प.पू. डॉक्टर किती मोठे आहेत, हे पहायचे असेल, तर त्याने सनातनच्या आश्रमात येऊन संस्था करत असलेले कार्य पहावे. त्यांनी ‘जे कार्य एका जन्मात केले आहे, ते एका जन्मात होणे शक्य नाही’, असे अद्वितीय आहे. स्थूल रूपातील कार्यातूनच कळते की, त्यांचे कार्य हे अवतारी आणि ईश्वरी आहे.’’ २. गुरु कधी शिष्याकडे जात नाहीत, तर शिष्याने आणि विद्यार्थ्याने गुरूंकडे जायचे असते ! : एकदा प.पू. डॉक्टरांना त्यांना भेटायचे होते. त्यामुळे एका साधकाने मला पू. आबांना विचारण्यास निरोप दिला, ‘‘मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत येऊ कि त्यांची प्रकृती ठीक असेल, तर ते येऊ शकतात ?’’ मी आबांना वरील प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले, ‘‘मी त्यांच्याकडे जातो. त्यांनी माझ्याकडे नको यायला. गुरु कधी शिष्याकडे जात नाहीत, तर शिष्याने, विद्यार्थ्याने गुरूंकडे जायचे असते.’’ – श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (८.६.२०२४) |
१. दिनक्रम शिस्तबद्ध असणे
‘भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा दिनक्रम शिस्तबद्ध आहे. ते रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास झोपतात आणि पहाटे ५ वाजता उठतात. पहाटे उठल्यावर वैयक्तिक आवरून झाल्यावर नामस्मरण करतात. अंघोळीच्या वेळी ते अर्घ्य देतात. (संध्यावंदनादी कामात सूर्याला उद्देशून जे ओंजळीतून उदक सोडतात, त्याला अर्घ्य म्हणतात.) नंतर गजानन सप्तशती आणि गजानन बावनीचा एक अध्याय वाचतात. पू. आबांच्या सर्व कृती वेळेवर ठरल्याप्रमाणे ते करतात.
२. वेळेचे काटेकोरपणे पालन करणे
त्यांच्या प्रसाद, महाप्रसाद आणि औषधे घेणे आदी सर्व कृती त्यांना वेळेवर केलेल्या आवडतात. एक दिवस सकाळचा प्रसाद (अल्पाहार) देण्यास मला १ मिनीट उशीर झाला. त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेला खाऊ खाण्यास प्रारंभ केला.
२ अ. इतरांना समजून घेणे : वरील प्रसंगात मी त्यांना माझी चूक झाल्याचे सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू प्रतिदिन मला गजर वाजल्याप्रमाणे प्रसाद, महाप्रसाद आणि औषध देतोस. एक दिवस काहीतरी अडचणीमुळे उशीर होऊ शकतो. त्यामुळे काळजी नको करूस आणि मला कुठेही जायचे नसते. येथेच रहायचे असते.’’
३. आश्रम अन् साधक यांचे अन्य परिचितांकडे कौतुक करणे
पू. आबांनी अनेक जणांना जोडून ठेवले आहे. त्यामुळे पू. आबांना अनेक जणांचे भ्रमणभाष येतात. ते त्या संबंधितांना सनातनचा आश्रम, तेथे चालणारे कार्य आणि साधना यांविषयी सांगतात. तसेच साधक त्यांची कशा प्रकारे काळजी घेतात, तेही सांगतात. ‘आश्रमात कशा प्रकारे साधना शिकवली जाते’, याविषयी त्यांनी माझ्याकडून जाणून घेतले होते. ते इतरांनाही तसे सांगतात. तसेच ‘आश्रमात येऊन निर्मळ साधना कशी करायची ? हे शिकायला या’, असेही सांगतात.
४. नातेवाइकांपेक्षा अधिक काळजी घेणारे साधक आणि आश्रम मिळाल्याने ‘ही प.पू. गजानन महाराजांची कृपा आहे’, असे सांगतांना भावजागृती होणे
पू. आबांना प्रसाद, महाप्रसाद आणि औषधे वेळेत दिल्यावर ते साधकांचे कौतुक करतात. ते म्हणतात, ‘‘तुम्ही साधक माझी माझ्या नातेवाइकांपेक्षा अधिक काळजी घेता. माझी नक्कीच पूर्वपुण्याई आहे; म्हणून मला माझी सेवा करणारे असे साधक आणि असा आश्रम मिळाला. ही केवळ प.पू. गजानन महाराजांची कृपा आहे’’, असे बोलून झाल्यावर त्यांची भावजागृती झाली.
५. पू. आबांनी आश्रमातील साधकांचे केलेले कौतुक !
अ. आश्रमातील साधकांशी माझी ओळख नाही; पण ते माझ्याकडे बघून आपुलकीने हसतात आणि मला आदरपूर्वक नमस्कार करतात.
आ. आश्रमातील साधक निर्मळ आहेत आणि ते मनापासून साधना करतात; म्हणून ते नेहमी आनंदी आहेत.
इ. त्यांना ईश्वराला मिळवायचे असून केवळ प.पू. डॉक्टरांची कृपा संपादन करून त्यांच्या संस्कारात घडायचे आहे.
ई. आश्रमात कधी कुणाचे वाद झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. सर्व साधक एका कुटुंबभावनेने अन् गुण्यागोविंदाने रहातात.
उ. आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद यांमध्ये करण्यात येणार्या विविध पदार्थांची चवही कायम एकसारखी असते. त्यात कधीही पालट नसतो. प्रसाद आणि महाप्रसाद बनवणार्या साधिका सुगरण असून सर्वांवरच श्री अन्नपूर्णादेवीची कृपा आहे.
६. ‘सनातनच्या आश्रमात करत असलेल्या साधनेविषयी आधीच कळले असते, तर पुष्कळ सेवा आणि साधना करू शकलो असतो’, असे पू. आबांना वाटणे
पू. आबा आश्रमात रहायला आल्यानंतर त्यांचे अनुयायी आणि नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्या वेळी पू. आबांनी त्यांना येथे साधक करत असलेली सेवा आणि साधना यांविषयी सांगण्यास सांगितले, तसेच त्यांना आश्रमही दाखवण्यास सांगितला. आश्रमातील तरुण आणि युवा साधकांना बघून ते मला म्हणाले, ‘‘मला आधी तुमच्याकडे अशी साधना करण्याविषयी का कळले नाही ? मला जर आधीच कळले असते, तर मीही तुमच्याप्रमाणे पुष्कळ सेवा अन् साधना करू शकलो असतो.’’
७. प.पू. डॉक्टर आणि आश्रम यांनी संस्कार केले असल्याने साधकाकडून सर्व कृती आपोआप घडत असल्याचे पू. आबांनी सांगणे
एकदा पू. आबांना मंदिरात दर्शनासाठी जाऊन परस्पर त्यांच्या नातेवाइकांकडे एक रात्रीसाठी वास्तव्याला जायचे होते. त्या वेळी मी त्यांना वाटेत खाण्यासाठी खाऊ, भ्रमणभाषचा ‘चार्जर’, त्यांचे एक दिवसासाठी लागणारे कपडे, त्यांची औषधे, पाण्याची बाटली असे विविध प्रकारचे साहित्य एका पिशवीत भरून दिले. त्यानंतर त्यांनी समवेत घेऊन जाण्याच्या वस्तूंची सूची मला सांगितली आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी आधीच पिशवीत सर्व भरून ठेवले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘खरेतर मी तुला काहीच विचारायला नको होते; कारण तू बुद्धीमान आहेस.’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘मी बुद्धीमान नाही; पण ‘गुरूंच्या कृपेने माझी बुद्धी चालत असून देवानेच मला तुम्हाला काय समवेत लागेल’, याची सूची अचूक दाखवली.’’ ते म्हणाले, ‘‘बरोबर आहे. आपली बुद्धी ही केवळ ईश्वरकृपेनेच चालते आणि तुझ्यावर प.पू. डॉक्टर अन् आश्रम यांनी संस्कार केलेले आहेत. त्यामुळे तुझ्याकडून सर्व आपोआप घडते. पुष्कळ चांगले आहे.’’
८. प.पू. गजानन महाराज यांच्याप्रतीचा भाव
वर्ष १९९१ मध्ये ते शेगाव येथे गेल्यावर त्यांच्या हातून ‘श्री गजानन महाराज बावन्नी’ साकार झाली. त्याच्या आजपर्यंत ३ कोटी प्रती प्रकाशित झाल्या. यातूनच कळते की, ‘बावन्नी सिद्ध होणे आणि ती ३ कोटींहून अधिक लोकांनी प्रतिदिन वाचणे’, ही महाराजांची कृपा आहे’, असे पू. आबांनी सांगितले.
९. कृतज्ञताभावात रहाणारे पू. आबा !
९ अ. म्हातारपणी स्वतःला काही गोष्टी करता येत नसल्याने बालक झाल्याची आणि कृतज्ञताभावाची जाणीव होणे : काही वेळा ते नटखट बालकाप्रमाणे जाणवतात आणि काही वेळा ते एक ज्ञानी ऋषिमुनींसारखे जाणवतात, तर काही वेळा ते प्रौढ वाटतात. एकदा ते म्हणाले, ‘‘मी वयाने ९० वर्षांचा आहे, मनाने २२ वर्षांचा, तर अंतर्मनाने ५ वर्षांच्या बालकाप्रमाणे आहे. म्हातारपणी स्वतःला काही गोष्टी करता येत नाही, त्या इतरांकडून करवून घ्याव्या लागतात. त्यामुळे आपण बालक झाल्याची आणि कृतज्ञताभावाची जाणीव होते.’’
९ आ. माणसाने नेहमी कृतज्ञतेतच रहायला हवे ! : ते नेहमी सांगतात, ‘‘मी नेहमी कृतज्ञताभावात रहातो. आपला श्वास सतत चालू असतो. त्यामुळे तो परमेश्वर आणि श्वास यांची किंमत आपल्याला कळत नाही. जेव्हा आपला श्वास अडकून हुंदके दिले जातात, तेव्हा आपल्याला श्वासाची, पर्यायाने त्या देवाची किंमत कळते. त्यामुळे आपण नेहमी कृतज्ञतेतच रहायला हवे.
९ इ. प्रत्येक गोष्ट विधात्याने ठरवल्याप्रमाणे घडत असून ‘श्वास किती घ्यायचा ?’ हेही विधात्याने ठरवलेले असल्याने त्याप्रमाणेच प्रत्येक जण शेवटचा श्वास घेणार आहे ! : आपण नेहमी म्हणतो की, मला आज अमुक व्यक्ती भेटली; पण जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट, मिळणारी वस्तू आणि होणारी भेट ही त्या विधात्याने लिहून ठेवल्याप्रमाणे आहे. आपल्याला उगाचच वाटते की, ती आपल्यामुळे झाली. प्रत्यक्षात आपण आपल्या आयुष्यात किती श्वास घ्यायचा, हेही विधात्याने ठरवलेले आहे. त्याप्रमाणेच आपण जगणार आणि ठरलेल्या वेळीच शेवटचा श्वास घेणार.’’
‘परात्पर गुरुमाऊली, ‘पू. आबांसारख्या एका महान ऋषितुल्य व्यक्तींच्या संपर्कात आणून आपणच आमच्याकडून साधना करून घेत आहात आणि आम्हाला घडवत आहात. या सेवेच्या निमित्ताने मला पुष्कळ काही शिकता आले, ते आचरणात आणून आपल्या चरणी एकरूप होता येऊ दे’, हीच प्रार्थना ! ‘मला पू. आबांची सेवा करण्याची संधी दिली’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. आबा यांच्या चरणी कृतज्ञता !’
– श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (८.६.२०२४)