कोल्हापूर – काल विशाळगडावर जो प्रकार झाला, त्या संदर्भात शाहूवाडी पोलीस ठाण्यात शिवप्रेमींविरुद्ध गुन्हा नोंदवल्याचे मला कळाले. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी मी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे मी दीड घंटा उपस्थित होतो. झालेल्या प्रकारात शिवप्रेमींचा दोष नसून तुम्ही माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदवा, अशी आग्रही भूमिका मी घेतली; मात्र पोलिसांनी मला अखेरपर्यंत माझ्यावर गुन्हा नोंदवला कि नाही ?, याचे उत्तर दिले नाही, अशी माहिती माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
१. विशाळगडावर १५ जुलैला सकाळपासून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. १४ जुलैला मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी मला जो शब्द दिला होता, त्याप्रमाणे ही अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत. या अतिक्रमणांमध्ये प्रकाश पाटील आणि वेल्हाळ यांचे अतिक्रमण काढले आहे. काही जणांनी या अतिक्रमणावरून नेहमी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. तो चुकीचा होता, हेच यावरून सिद्ध होते. विशाळगडावर जे अतिक्रमण आहे, ते कुणाचेही असो, ते निघालेच पाहिजे, अशी माझी प्रारंभीपासूनची भूमिका होती.
२. खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना माझ्यासमवेत मुख्यमंत्री अन् गृहमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्याची सूचना केली होती. ही बैठक मुंबईत होणार होती; दुर्दैवाने ती बैठक झाली नाही. या संदर्भात कोल्हापूर येथे बैठक घेऊ, अशी छत्रपती शाहू यांची इच्छा होती; मात्र हा प्रश्न स्थानिक पातळीवर सुटणार नाही, असे मी सांगितले होते.
३. खासदार छत्रपती शाहू महाराज मला म्हणाले की ‘मी काल आक्रमक झालो होतो.’ एक खासदार म्हणून, जिल्ह्याचे पालक म्हणून आणि वडील म्हणून त्यांची भूमिका त्यांच्या जागी योग्य आहे. त्याचा मी स्वीकार करतो; मात्र मी माझ्या स्वत:च्या कोणत्याही स्वार्थासाठी आक्रमक झालो नव्हतो, तर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक होतो. त्यामुळे ‘मी आक्रमक झालो होतो’, याचे मला वाईट वाटत नाही.