Muharram Under Threat In Pakistan : पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या भीतीमुळे पोलिसांना घरी जातांना गणवेश न घालण्याची सूचना

मोहरमच्या कालावधीत होणार्‍या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर दिली सूचना

इस्लामाबाद – कराचीचे पोलीस उपअधीक्षक तारिक इस्लाम यांनी अधिकार्‍यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. सध्या पोलिसांवर होत असलेल्या आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना कर्तव्यावर एकटे न जाण्याचे आवाहन केले आहे. मोहरमच्या कालावधीत सरकारी अधिकार्‍यांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशी चेतावणीही अधिसूचनेत देण्यात आली आहे. पोलिसांनी काम संपवून घरी परततांना गणवेश आणि बूट घालणे टाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मोहरमच्या काळात सुन्नी आणि शिया समुदायांमध्ये हिंसाचार होतो. या काळात पोलिसांवरही आक्रमणे होतात. त्या पार्श्‍वभूमीवर वरील निर्देश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानात सशस्त्रदल तैनात

सिंध, बलुचिस्तान, खैबर-पख्तुनख्वा आणि इस्लामाबाद येथील अधिकार्‍यांनी कायदा अन् सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्य तैनात करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सरकारने मोहरमच्या महिन्यात सुरक्षा सुनिश्‍चित करण्यासाठी देशभरात सशस्त्रदल तैनात करण्यास मान्यता दिली.

पाकिस्तानात ५०२ ठिकाणे संवेदनशील !

पाकिस्तानमध्ये विविध क्षेत्रांमध्ये सध्या कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंजाबमधील ५०२ ठिकाणे ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी सैन्य तैनात करण्यात आले आहे.

मोहरमच्या काळात हिंसाचार का होतो ?

मोहरम हा शिया मुसलमानांचा सण आहे. इस्लामच्या प्रेषिताच्या नातवाच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या वेळी शिया मुसलमान मोठे मेळावे घेतात आणि मिरवणूक काढतात. शिया आणि सुन्नी मुसलमान यांच्यात हाडवैर आहे. त्यामुळेच मोहरमच्या काळात कट्टरतावादी सुन्नी गट शिया मुसलमानांच्या मिरवणुकांना लक्ष्य करण्याच्या घटना घडतात. या कालावधीत पाकिस्तानमध्ये बाँबस्फोट किंवा आत्मघाती आक्रमणे होण्याची भीती कायम असते.

संपादकीय भूमिका 

मुसलमान जिथे बहुसंख्य असतात, तेथे ते हिंसाचार करून एकमेकांना ठार मारतात, हा इतिहास आहे. त्यामुळे पाकिस्तानात अराजक माजल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !