राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ !

१ जानेवारीपासून थकबाकीसह मिळणार लाभ !

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचे शुल्क ४६ वरून ५० टक्के करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सहस्रो कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

सरकार कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. १ जानेवारी आणि १ जुलै या दिनांकांना ही वाढ केली जाते; पण निर्णय विलंबाने घेतला जातो. त्यानुसार सरकारने १० जुलै या दिवशी राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात १ जुलैपासून ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार ही वाढ १ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनासमवेत रोखीने दिली जाणार आहे. शासकीय आणि निमशासकीयसह जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.