PM Modi Russia Visit : भारत आणि रशिया यांच्‍यातील संबंध अधिक दृढ, तर अमेरिकेने रशियाला वाळीत टाकण्‍याच्‍या प्रयत्नाला सुरुंग !

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍या भेटीवर जागतिक प्रसारमाध्‍यमांचा सूर !

भारताचे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्‍को येथे रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन यांची भेट घेतल्‍याच्‍या घटनेला जगभरातील प्रसारमाध्‍यमांनी मोठी प्रसिद्ध दिली आहे. प्रत्‍येकाने या घटनेकडे वेगवेगळ्‍या दृष्‍टीने पाहिले आहे. बहुतेकांचा सूर ‘भारत आणि रशिया यांच्‍यातील संबंध अधिक दृढ होत असून अमेरिका आणि युरोप यांच्‍याकडून रशियाला वाळीत टाकण्‍याच्‍या प्रयत्नाला सुरुंग लागला आहे’, असे म्‍हटले आहे.

विविध वर्तमानपत्रांनी केलेले वार्तांकन !

१. न्‍यूयॉर्क टाइम्‍स (अमेरिका) : पंतप्रधान मोदी यांच्‍या रशियाच्‍या दौर्‍यामुळे पुतिन यांना एकाकी पाडण्‍याचे प्रयत्न कमकुवत झाले आहेत. त्‍याचबरोबर युक्रेनची नाराजी यामुळे वाढली आहे. ‘भारताचे अमेरिकेसमवेतचे संबंध दृढ होत असले, तरी रशिया आणि भारत यांच्‍यातील सखोल संबंध कायम आहेत’, हे पंतप्रधान मोदी यांच्‍या दौर्‍यामुळे रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांना जगाला दाखवण्‍याची संधी मिळाली आहे. पाश्‍चिमात्‍य देश रशियाला कमकुवत करण्‍याचा प्रयत्न करत असले, तरी रशिया ज्‍या प्रकारे इतर देशांशी संबंध वाढवत आहे, त्‍यामुळे त्‍याची अर्थव्‍यवस्‍था भक्‍कम झाली आहे.

२. द वॉशिंग्‍टन पोस्‍ट  (अमेरिका) : मोदी यांच्‍या या भेटीतून भारत पाश्‍चिमात्‍य देशांच्‍या बाजूने गेला नसल्‍याचे दिसून येते. युक्रेन युद्ध प्रारंभ झाल्‍यानंतर ही भेट स्‍पष्‍टपणे दर्शवते की, अमेरिकेच्‍या दबावाला न जुमानता भारत रशियासमवेतचे त्‍याचे दृढ संबंध कायम ठेवणार आहे. सत्तेवर आल्‍यानंतर एका महिनाही झाला नसतांना मोदी यांनी रशियाला भेट दिली. किंबहुना यातून त्‍यांना हे दाखवायचे आहे की, भारत-अमेरिकेतील संबंध खूप प्रगती करत असले, तरी भारत अजूनही पाश्‍चिमात्‍य देशांच्‍या बाजूने गेलेला नाही.

३. व्‍हॉईस ऑफ अमेरिका : पुतिन यांच्‍यासाठी ही भेट महत्त्वाची आहे; कारण यातून ते पाश्‍चिमात्‍य देशांना संदेश देत आहेत की, त्‍यांनी लादलेल्‍या निर्बंधांचा रशियावर कोणताही परिणाम झालेला नाही.

४. बीबीसी हिंदी (ब्रिटन) : ‘नाटो’ देशांनी (‘नाटो’ म्‍हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) युक्रेनवरील मॉस्‍कोच्‍या कारवाईचा तीव्र शब्‍दांत निषेध केला असतांना मोदी यांनी पुतिन यांच्‍यावर आजपर्यंत स्‍पष्‍ट शब्‍दांत टीकाही केलेली नाही. विविध निर्बंध लादून पाश्‍चिमात्‍य देश रशियाला कमकुवत करण्‍याचा प्रयत्न करत आहेत; मात्र पुतिन भारत आणि चीन या देशांच्‍या नेत्‍यांशी संबंध दृढ करण्‍यात व्‍यस्‍त आहेत.

५. गार्डियन (ब्रिटन) : युक्रेन युद्धाच्‍या संकटानंतरही मोदी आणि पुतिन यांनी मैत्री आणखी घट्ट केली आहे. मोदी यांनी पुतिन यांना सल्ला दिला की, शांततेचा मार्ग युद्धभूमीतून येत नाही; परंतु मोदी यांच्‍या शब्‍दांचा पुतिन यांच्‍या महत्त्वाकांक्षेवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही.

६. ग्‍लोबल टाइम्‍स (चीन) : भारताच्‍या या निर्णयामुळे पाश्‍चिमात्‍य देश निराश झाले आहेत. हे देश भारताच्‍या रशियाशी घट्ट होत असलेल्‍या संबंधांविषयी अधिक चिंतित असल्‍याचे दिसत आहे. चीन रशिया-भारत यांच्‍या संबंधांना धोका म्‍हणून पहात नाही, तर पाश्‍चात्त्य देश भारताच्‍या रशियाशी असलेल्‍या संबंधांवर नाराज असल्‍याचे दिसत आहे. पाश्‍चात्त्य देशांनी भारताला त्‍यांच्‍या छावणीत खेचण्‍याचा आणि चीनचा प्रभाव संतुलित करण्‍याचा प्रयत्न केला आहे. त्‍यांना आशा होती की, भारत रशियाच्‍या विरोधात उभा राहील आणि त्‍यांच्‍याशी युती करेल; परंतु भारताच्‍या या हालचालीने त्‍यांची निराशा झाली आहे.