वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोट खटल्याचे प्रकरण
मुंबई – येथे वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट खटल्याचा प्रमुख सूत्रधार टायगर मेमन, त्याचा भाऊ याकूब मेमन आणि मेमन परिवारशी संबंधित १४ जणांची अचल संपत्ती जप्त करून केंद्र सरकारला द्या, असा आदेश टाडा न्यायालयाने दिला आहे. त्यात दुकाने, फ्लॅट, कार्यालये आणि रिकामे प्लॉट आहेत. ही संपत्ती मुंबईतील उच्चभ्रू भाग असलेला वांद्रे येथील अलमेडा पार्क, सांताक्रूज, कुर्ला आणि माहीममध्ये येथील आहे. वर्ष १९९४ मध्ये ही संपत्ती जप्त करण्यात आली होती.
संपत्तीच्या मालकात टायगर मेमन, याकूब मेमन, अब्दुल रजाक मेमन, एसा मेमन, यूसुफ मेमन आणि रुबीना मेमन यांचा समावेश आहे. ‘ही संपत्ती विकून किंवा इतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्याची िकंमत अन् खर्च वसूल करण्यात यावा’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
टाडा न्यायालयाने ही संपत्ती केंद्र सरकारकडे देण्याचा आदेश देण्यापूर्वी मेमन कुटुंबियांना नोटीस पाठवून उत्तर मागितले होते; परंतु टायगर मेमन आणि अन्य कुटुंबियांकडून काहीच उत्तर आले नाही. टायगर मेमन पसार आहे. त्याचा भाऊ याकूब मेमन याला वर्ष २०१५ मध्ये फाशी देण्यात आली. न्यायालयाला उत्तर न मिळाल्यामुळे ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.