शिरशिंगे ग्रामस्थांचे रस्ता आणि वीजपुरवठा मागणीसाठीचे उपोषण स्थगित

काम त्वरित चालू करण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन

सावंतवाडी – तालुक्यातील शिरशिंगे गावातील प्रमुख जिल्हा मार्ग २८, शिरशिंगे शाळा क्रमांक २ ते गोठेवाडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि शिरशिंगे ते गोठवेवाडी, परबवाडी, मळईवाडी या वाड्यांसाठी नवीन ११ ‘केव्ही’ विद्युत्वाहिनी संमत होऊनही कामे रखडल्याने येथील ग्रामस्थ प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी प्रशासनासमवेत केलेल्या चर्चेनंतर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत काम चालू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी दुपारी उपोषण स्थगित केले.

माजी सरपंच सुरेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १, सावंतवाडी यांच्या उपविभागीय अभियंत्यांनी सुरेश शिर्के यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिरशिंगे ते कलंबिस्त, सांगेली, धवडकी, दाणोली, बांदा या रस्त्याचे काम विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत संमत असून निधी उपलब्धतेनुसार पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे, तसेच हे काम १९ एप्रिल २०२५ पासून चालू करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे.

महावितरण उपविभाग, सावंतवाडी यांच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी नागरिकांना दिलेल्या पत्रात ‘शिरशिंगे गावातील धोंडवाडी ते गावठाण वाडी या ११ ‘केव्ही’ वीजवाहिनीचे अंदाजपत्रक महावितरण आस्थापनाने १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी संमत केले आहे. जिल्हा नियोजन कार्यालयाकडून प्रशासकीय संमती मिळाल्यानंतर हे काम चालू करण्यात येईल. त्यांनीही ग्रामस्थांना उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे’, असे म्हटले आहे.

प्रशानाकडून मिळालेल्या या लेखी आश्वासनानंतर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि मनीष दळवी यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याची चेतावणीही ग्रामस्थांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

नागरिकांनी उपोषण आणि आंदोलन केल्यावर काम चालू करणारे प्रशासन काय कामाचे ?