अनधिकृत वाळू वाहतूक करणार्‍या डंपरचालकांवर मालवणच्या तहसीलदारांची कारवाई

(डंपर म्हणजे अवजड साहित्य वाहून नेणारे वाहन)

मालवण – येथे अनधिकृत वाळूची वाहतूक करणार्‍या डंपरवर तहसीलदार वर्षा झालटे यांनी कारवाई केली. ३१ मार्च या दिवशी मालवण-कोळंब-रेवतळे सागरी महामार्गावर ७ डंपर काह्यात घेण्यात आले. कारवाईच्या वेळी २ डंपरचालक रस्त्यावरच वाळू ओतून पळून गेले.

तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखाली महसूल खाते आणि पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाळूची विनापरवाना वाहतूक करणारे ६ डंपर कह्यात घेऊन ते पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालयात नेण्यात आले. कारवाईच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करणारा गोवा येथील परवाना असलेला १ डंपर रस्त्याच्या कडेला कलंडला होता. तोही कह्यात घेण्यात आला. खाडीपात्रातील वाळू उपसण्यासाठी निविदा (टेंडर) दिली असतांनाही या डंपरद्वारे अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत होती, असे अन्वेषणात स्पष्ट झाले आहे.