
सातारा, १ एप्रिल (वार्ता.) – श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली; परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीने छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज, तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अपमान होईल, असे भाष्य, टीपणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळून समाजामध्ये दुरी पसरते. केंद्र आणि राज्य शासनाने अशा प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका किंवा टाडा यांच्यासारखा अजामीनपात्र अन् १० वर्षे सश्रम कारावासाची तसेच दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा संमत करावा, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
राज्यशासनाने तज्ञांशी विचारविनिमय करून ऐतिहासिक कागदपत्रांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिद्ध करणे आवश्यक होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती त्याला जसे समजले, वाटले अशा पद्धतीने इतिहासातील प्रसंगांचे वर्णन करून अकारण विवाद निर्माण करते. यामुळे शेजारी रहाणार्यांची मने कलुषित होतात. याचे दीर्घकालीन परिणाम समाजाला भोगावे लागतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधिकृतपणे प्रसिद्ध करावा. तसेच केंद्रशासनाच्या वतीने शिवरायांचे एक राष्ट्रीय स्मारक नवी देहली येथे उभारावे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे.
‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ यांनी हे क्षेत्र संरक्षित केले आहे; मात्र हे क्षेत्र अद्याप दुर्लक्षित आणि अविकसित आहे. त्यामुळे शहाजीराजांसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची समाधी आणि आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने भरीव निधी उपलब्ध करून देणे, हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.
शिवप्रभूंच्या काळात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. त्याचे साक्षीदार असलेल्या स्वराज्याच्या ४ राजधान्या आणि अन्य ऐतिहासिक ठिकाणांचे शिवस्वराज्य सर्किट निर्माण केल्यास गडदुर्गां जतन होऊन भावी पिढीला चिरंतन प्रेरणा मिळणार आहे.