नायपिडॉ (म्यानमार) – म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या २ सहस्र ५६ वर पोचली आहे. तेथील सरकारने ही माहिती दिली. भूकंपामध्ये घायाळ झालेल्यांची संख्या ३ सहस्र ९०० पेक्षा अधिक झाली आहे. भूकंपानंतर २७० लोक अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर ३१ मार्च या दिवशी ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी ६ एप्रिलपर्यंत देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल, असे सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. २८ मार्च या दिवशी म्यानमार आणि थायलंड या देशांमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. हा २०० वर्षांतील सर्वांत मोठा भूकंप होता. अमेरिकेच्या ‘जिओलॉजिकल सर्व्हे’ने मृतांचा आकडा १० सहस्रांपेक्षा अधिक असू शकतो’ अशी भीती व्यक्त केली आहे.
१. म्यानमारमधील मंडाले प्रांताला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. १७ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले हे देशातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे.
२. बहुतेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे सलग तिसर्या रात्री ते रस्त्यांवर झोपले. भूकंपानंतर येणार्या धक्क्यांमुळे लोक घाबरले आहेत.
३. म्यानमारच्या बहुतेक भागांत अजूनही संपर्क तुटलेला असल्याने हानीचे पूर्ण प्रमाण अद्याप समजलेले नाही.
भारताकडून म्यानमारला साहाय्य
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर म्हणाले की, भारतीय नौदलाच्या नौका आय.एन्.एस्. सातपुरा आणि आय.एन्.एस्. सावित्री यांनी ‘ऑपरेशन ब्रह्मा’च्या अंतर्गत म्यानमारमधील यांगून बंदरात ३० टन साहित्य पाठवले. यासह भूकंपग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी भारतातून ११८ जणांचे वैद्यकीय पथक म्यानमारमध्ये पोचले आहे.