चिपी विमानतळावरून पुन्हा प्रवासी विमान वाहतूक चालू

‘फ्लाय ९१’ या आस्थापनाच्या सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवेला प्रारंभ

चिपी – सिंधुदुर्गातील एकमेव चिपी विमानतळावरून पुन्हा एकदा प्रवासी विमान वाहतूक चालू करण्यात आली. २ मासांनंतर १ एप्रिल २०२५ पासून चिपी विमानतळ क्रियाशील झाले आहे. १ एप्रिलला सकाळी ‘फ्लाय ९१’ या आस्थापनाची सिंधुदुर्ग-पुणे ही विमानसेवा चालू झाली. सकाळी ७.५० वाजता हे विमान पुणे येथून निघाले आणि ९.१० वाजता चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर पोचले. या विमानातून १० प्रवाशांनी प्रवास केला, तर सिंधुदुर्गातून पहिल्या दिवशी ६ प्रवासी विमानाद्वारे पुणे येथे गेले.

शुक्रवार आणि सोमवार वगळता आठवड्यातून ५ दिवस ही विमानसेवा चालू रहाणार आहे. गेले काही मास सिंधुदुर्ग विमानतळावर तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी विमानसेवा बंद होती. या विषयावरून मध्यंतरी राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले.