
लोणी काळभोर (पुणे) – येथे ‘तुम्हाला माझ्या मुलीला व्यवस्थित शिकवता येत नाही’, असे म्हणत शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना कदमवाक वस्ती येथील एका नामांकित शाळेमध्ये २८ मार्च या दिवशी घडली. या प्रकरणी गणेश अंबिके या पालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ४० वर्षीय शिक्षिकेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
शिक्षिका या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याचे काम करत होत्या, तेव्हा अंबिके हा वर्गामध्ये आला. ‘मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही वर्गाबाहेर चला’, असे सांगू लागला, तेव्हा शिक्षिकेने नकार दिला. तेव्हा आरोपीने लगट करण्याचा प्रयत्न केला. अश्लील भाषमध्ये शिवीगाळ करू लागला. ‘तुला काय करायचे असेल ते कर, मी कुणालाही घाबरत नाही’, असे म्हणत शिक्षिकेला जिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा तेथील सहशिक्षिकेने हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही ढकलून दिले. अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांचाही विनयभंग केला.