
नाशिक – येथून २ एप्रिलपासून तमिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा चालू होणार आहे. त्यामुळे तेथे ४ घंट्यांत पोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून ३१ मार्चपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी विमानसेवा चालू झाली. यामध्ये तिरूपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई आस्थापनाकडून देहली, कर्णावती (अहमदाबाद), भाग्यनगर (हैदराबाद), गोवा, इंदूर, बेंगळूरू, जयपूर आदी शहरांसाठी विमानसेवा दिली जाते.
हॉपिंग फ्लाईटने देश-विदेशांतील शहरांना जोडणार्या विमानसेवेचे वेळापत्रक घोषित केले. ३० मार्च ते २५ ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक लागू असेल. या वेळापत्रकानुसार देहली, कर्णावती (अहमदाबाद), भाग्यनगर (हैदराबाद), बेंगळूरू या विमानतळांवरून बेळगाव, चंदीगढ, दरभंगा, कोझीकोड, देहरादून, जबलपूर, गया, पंचनगर, विजयवाडा, विशाखापट्टणम्, मदुराई आदी शहरांसाठी ‘कनेक्टिंग’ विमानसेवेचा लाभ नाशिककरांना घेता येईल.