देव, देश आणि धर्मकार्य यांसाठी संघटित होण्याचा पिंपरी-चिंचवड येथील मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

बैठकीला उपस्थित मंदिर विश्वस्त आणि मंदिर कार्यकारणीचे सभासद सदस्य

पुणे, १ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान येथे पिंपरी-चिंचवड येथील मंदिर विश्वस्तांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या आरंभीला हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. महाराष्ट्र मंदिर महासंघ या मंदिर विश्वस्तांच्या अराजकीय संघटनेची पार्श्वभूमी सांगतांना या संघटनाची आवश्यकता, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम, मंदिर सरकारीकरण माध्यमातून शासनाने मंदिरांवर नेमलेल्या प्रशासकांचे मनमानी आणि धर्मविरोधी निर्णय याविषयी त्यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र मंदिर महासंघ पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे यांनी मंदिरांसाठी वस्त्रसंहितेची (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक वेशभूषा) आवश्यकता सांगतांना या आचारसंहितेतील सूत्रे आणि त्यामागची भूमिका स्पष्ट केली. सर्व विश्वस्तांनी देव, देश आणि धर्मकार्य यांसाठी संघटित होऊन सक्रीय सहभागी होण्याची शपथ एकत्रितरित्या घेतली.

मार्गदर्शन करतांना ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज (उजवीकडून दुसरे)

या बैठकीला खंडोबा देवस्थान, आकुर्डीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल काळभोर, श्रीमंत दगडूशेठ गणपति मंदिर ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड समन्वयक श्री. महेश कोळपकर, संस्कृती संवर्धन आणि विकास महामंचाचे कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप, माजी नगरसेवक श्री. दत्तात्रय पवळे यांसह सुमारे ५० विश्वस्त आणि मंदिर कार्यकारणीचे सभासद सदस्य यांची उपस्थिती लाभली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. या वेळी डॉ. अजित जगताप यांनी पिंपरी-चिंचवड येथील सर्व मंदिरांतील आरती प्रतिदिन एकाच वेळी व्हावी आणि शनिवार/रविवारी मंदिरातील आरती ही लहान मुलांकडून व्हावी जेणेकरून हे संस्कार पुढील पिढीला मिळतील, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

२. श्री. पराग गोखले यांच्या सण सामूहिकरित्या साजरे करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देतांना येत्या गुढीपाडव्याला पिंपरी-चिंचवड मधील १०१ मंदिरांमध्ये सामूहिक गुढी उभारण्याचे आणि येथून पुढे महिन्यातून एकदा सर्व मंदिर विश्वस्तांनी एकत्र भेटण्याचे ध्येय मंदिर विश्वस्तांकडून एकमताने घेण्यात आले.