राज्यातील धरणांत मे अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा  ! – जलस्रोतमंत्री शिरोडकर

४ धरणांचे पाणी निम्म्याहून अल्प

आमठाणे जलाशयाचे संग्रहित छायाचित्र

पणजी, १ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाण्याचा साठा निम्म्याहून अल्प झालेला आहे; मात्र जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या मते राज्यातील सर्व धरणांमध्ये मे मासाच्या अखेरपर्यंत पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे.

जलस्रोत खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणार्‍या साळावली धरणात ६२ टक्के पाणी शिल्लक आहे. काणकोण येथील चापोली आणि गावणे धरण येथे अनुक्रमे ६४ टक्के आणि ६८ टक्के पाणी शिल्लक आहे. उत्तर गोव्याला पाणीपुरवठा करणार्‍या तिलारी धरणामध्ये ४१ टक्के पाणी शिल्लक आहे. सत्तरी तालुका आणि डिचोली तालुक्यातील काही भाग यांना पाणीपुरवठा करणार्‍या अंजुणा धरणात ४८ टक्के पाणी शिल्लक आहे. बार्देश, पेडणे आणि डिचोली तालुक्यांतील काही भाग यांना पाणीपुरवठा करणार्‍या आमठाणे धरणात केवळ २७ टक्के पाणी शिल्लक आहे. पंचवाडी धरणामध्ये ४८ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्याचे अजून २ मास बाकी असल्याने पाण्याची मागणीही वाढणार आहे. याविषयी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘धरणातील पाण्याचा साठा अपेक्षेनुसार नियंत्रणात आहे. सरकारने पाण्याचे योग्य प्रमाणात नियोजन करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बंधारे आहेत आणि पाण्याचे दुर्भिक्ष झाल्यास या बंधार्‍यांचे पाणी वापरले जाणार आहे.’’