Muhammad Yunus Threatens India : भारतातील ७ राज्ये भूमीने वेढलेली असून त्यांना समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग आमच्याकडेच !

  • बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांची चीनमध्ये जाऊन भारताला गर्भित धमकी !

  • चीनला बांगलादेशात कारखाने स्थापन करण्याचे केले आवाहन !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस

बीजिंग (चीन) – भारतातील ७ राज्ये, ज्यांना ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणतात, ती भूमीने वेढलेली आहेत. त्यांना समुद्रापर्यंत पोचण्याचा कोणताही मार्ग नाही. या प्रदेशातील समुद्राचे आम्ही एकमेव रक्षक आहोत. यामुळे अमर्याद पर्याय खुले आहेत, अशा शब्दांत बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांनी भारताला गर्भित चेतावणी देत चीनला बांगलादेशात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. (चीनला भारताची ७ राज्ये गिळंकृत करायची असतील, तर बांगलादेशात चीनने गुंतवणूक करावी, असे युनूस म्हणत आहेत. अशांना धडा शिकवणे अपरिहार्य आहे ! – संपादक) चीनच्या ४ दिवसांच्या दौर्‍यावर असलेले युनूस यांनी उद्योजकांच्या एका बैठकीत ईशान्य भारताच्या संदर्भात वरील विधान केले. या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून प्रसारित केला आहे.

१. फेसबुकवरील आणखी एका सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी असेही लिहिले की, चीनने त्यांचे कारखाने बांगलादेशात स्थलांतरित करावेत. बांगलादेशात चिनी अर्थव्यवस्था विस्तारू शकते. बांगलादेश पश्चिम आशियात उत्पादने निर्यात करण्यासाठी एक उत्पादन केंद्र बनू शकतो. या देशात कोणतेही व्यापार निर्बंध नाहीत. थेट परकीय गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट स्पर्धात्मक वातावरण आणि नफ्याच्या संधी मिळतात.

२. यापूर्वी युनूस यांनी बांगलादेश आणि चीन यांच्यातील संबंध भक्कम करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. त्यांनी चीनला ‘बांगलादेशाचा चांगला मित्र’ असे म्हटले. चीन दौर्‍याच्या समारोपाच्या वेळी युनूस यांनी ‘दोन्ही देशांमध्ये सहकार्याचा एक नवीन टप्पा सुरू होईल’ अशी आशाही व्यक्त केली.

युनूस यांच्या चिथावणीखोर विधानांना गांभीर्याने घ्यावे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

महंमद युनूस यांच्या विधानावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, युनूस यांच्या अशा चिथावणीखोर विधानांना गांभीर्याने घेतले पाहिजे. युनूस यांच्याकडे यासंदर्भात खोलवरचे धोरणात्मक विचार आणि दीर्घकालीन कार्यसूची असेल. युनूस यांचे वक्तव्य भारताच्या धोरणात्मक ‘चिकन नेक कॉरिडॉर’ (बंगालमध्ये असणारे अनुमाने २२ किलोमीटर लांबीचा अत्यंत रुंद भूभाग. ईशान्येकडील ७ राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा हा एकमेव भूमार्ग आहे) हालचाली प्रतिबिंबित करते.

ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील अंतर्गत घटकांनी ईशान्येकडील राज्यांना वेगळे करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग तोडण्याचा धोकादायक सल्ला युनूस यांनी दिला आहे. म्हणून ‘चिकन नेक कॉरिडॉर’च्या आजूबाजूला अधिक भक्कम रेल्वे आणि रस्ते यांचे जाळे विकसित करणे आवश्यक आहे. ईशान्येकडील भागांना उर्वरित भारताशी जोडणारे पर्यायी रस्ते शोधण्यास आणि विकसित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

या विधानाचा अर्थ काय ? – संजीव सान्याल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी एक्सवर युनूस यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, बांगलादेशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चीनचे स्वागत आहे; पण भारताची ७ राज्ये भूमींनी वेढलेली असण्याचा काय अर्थ आहे ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

त्रिपुरातील टिपरा मोथा पक्षाचे प्रमुख प्रद्योट किशोर माणिक्य देबबर्मा यांनी युनूस यांच्या विधानाचा निषेध करत म्हटले की, वर्ष १९४७ मध्ये सध्याच्या बांगलादेशातील चितगाव बंदर सोडून देणे ही भारताची सर्वांत मोठी चूक होती. स्वदेशी लोकांच्या पाठिंब्याने समुद्रापर्यंत जाण्यासाठी मार्ग बांधण्यात आला पाहिजे.

संपादकीय भूमिका

बांगलादेश भारतासाठी दुसरे पाकिस्तान झाले आहे. पाकला गेल्या ७८ वर्षांत भारताने सरळ केले नाही, तिच निष्क्रीयता बांगलादेशाच्या संदर्भात भारत दाखवत असल्यामुळेच युनूस अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस करत आहेत, हे भारताला धोक्याचे आहे !