
पणजी, १ एप्रिल (वार्ता.) – भाजप आणि मगोप यांच्यातील प्रदेशपातळीवरील वाद आता देहलीत पोचला आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी १ एप्रिल या दिवशी देहली येथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल्. संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी भाजप आणि मगोप युतीविषयी चर्चा केली.
‘मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रियोळ आणि मांद्रे मतदारसंघांविषयी मगोपच्या विरोधात भूमिका घेतली. त्याचप्रमाणे ढवळीकर बंधूंविषयी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी खालच्या दर्जाच्या भाषेत उल्लेख केला. भाजपच्या मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे ? मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून सत्तेत घटक असलेल्या मगो पक्षाची कोंडी होत आहे. काही वक्तव्ये ठराविक मर्यादेपर्यंतच ठीक असतात. विधानसभा निवडणुकीला अजून २ वर्षे असतांना युतीचा विषय आताच का उपस्थित व्हावा ? मुख्यमंत्र्यांनी युतीवरून कडक चेतावणी आताच का द्यावी ?’, असे विविध प्रश्न सरचिटणीस बी.एल्. संतोष यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चेला आले.
भाजप-मगोप युती कायम राहील ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
भाजप-मगोप यांच्यात नेतृत्वाच्या पातळीवर कोणतेही वाद नाहीत. त्यामुळे भाजप-मगोप युती धोक्यात आलेली नाही. दोन्ही पक्षांची युती तुटणार, असे मी कधीच म्हणालो नाही. हा निर्णय केंद्रीय नेते घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.