कोल्हापूर – पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या सिद्धतेचा आढावा ८ जुलै या दिवशी कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. या वेळी महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी सर्व उपशहर अभियंत्यांना दिल्या. उद्यान विभागाने धोकादायक झाडांची सूची करून ‘झाड समिती’ची मान्यता घेऊन धोकादायक झाडांच्या फांद्या लवकर छाटणी करण्याच्या सूचना दिल्या.
संभाव्य पूर परिस्थितीच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे भ्रमणभाष चालू ठेवावेत. पुढील २ महिने अनुमती न घेता कुणीही रजेवर जाऊ नये. आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्ययंत्रणेने सर्व्हे वाढवावा. अग्नीशमन विभागाने त्यांच्याकडील सर्व साधन सामुग्री सज्ज ठेवावी. शहरात जी बांधकामे चालू आहेत त्यांची खरमाती, वाळू आणि इतर साहित्य रस्त्यावर पडलेले असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तरी अशा बांधकामांवर दंडात्मक कारवाई करावी. यासाठी नगररचना, विभागीय कार्यालय आणि आरोग्य विभागाने समन्वय ठेऊन कारवाई करावी, अशा सूचना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.
या बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, साहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.