Discussions Restores Peace, Not War : युद्धामुळे नाही, तर चर्चेद्वारेच शांतता निर्माण होईल ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्‍ट्रपती पुतिन यांना दिला सल्ला !

डावीकडून पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्रपती पुतिन

मॉस्‍को (रशिया) – युद्धभूमीवर उपाय शोधता येत नाहीत. शांततेसाठी संवाद साधणे पुष्‍कळ महत्त्वाचे आहे. भारत नेहमीच शांततेच्‍या बाजूने राहिला आहे; कारण युद्ध हा उपाय नाही. मी शांततेची आशा करतो. शांततेसाठी मी सहकार्य करण्‍यास सिद्ध आहे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन यांच्‍याशी झालेल्‍या भेटीत युक्रेनसमवेच्‍या युद्धावरून त्‍यांना दिला. यावर पुतिन यांनी सल्‍ल्‍याचा सन्‍मान राखत मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान २ दिवसांच्‍या रशियाच्‍या दौर्‍यावर असतांना पुतिन यांच्‍यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. त्‍या वेळी ते बोलत होते. तत्‍पूर्वी पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचा त्‍यांच्‍या खासगी निवासस्‍थानी पाहुणचार केला. येथे मोदी यांना ८ जुलैच्‍या रात्री भोजनाचे आमंत्रण दिले होते. येथेच पंतप्रधान मोदी यांनी निवास केला.

पंतप्रधान बैठकीत पुढे म्‍हणाले की, युद्ध असो, संघर्ष असो, आतंकवादी आक्रमणे असोत, मानवतेवर विश्‍वास ठेवणार्‍या प्रत्‍येकाला जेव्‍हा जीवितहानी होते, तेव्‍हा दुःख होते. जेव्‍हा निष्‍पाप मुले मारली जातात, तेव्‍हा ते हृदयद्रावक असते. गेल्‍या ४० ते ५० वर्षांपासून भारत आतंकवादाचा सामना करत आहे. आतंकवाद किती भयंकर आणि घृणास्‍पद आहे, याचा आपण ४० वर्षांपासून सामना करत आहोत. मॉस्‍को आणि दागेस्‍तान येथील आतंकवादी घटनांची वेदना आपण अनुभवू शकतो. त्‍याची वेदना किती खोल असेल याची मी कल्‍पना करू शकतो. मी सर्व प्रकारच्‍या आतंकवादाचा तीव्र निषेध करतो.

भारत रशियामध्‍ये २ नवीन वाणिज्‍य दूतावास उघडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामध्‍ये २ नवीन वाणिज्‍य दूतावास चालू करण्‍याची घोषणा केली. रशियातील कझान आणि येकातेरिनबर्ग येथे भारतीय वाणिज्‍य दूतावास उघडण्‍यात येणार असल्‍याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. मॉस्‍कोमध्‍ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली.

संपादकीय भूमिका

मागील ७५ वर्षे भारत पाकिस्तानसमवेत चर्चा करत होता; मात्र भारताला कधीही शांतता मिळाली नाही, हीसुद्धा एक वस्‍तूस्‍थिती आहे !