Bangladesh Terrorist Active In Wb : बंगालमध्‍ये बांगलादेशी आतंकवादी संघटना सक्रीय

  • ३ आतंकवाद्यांच्‍या अटकेनंतर मिळाली माहिती !

  • बंगालमध्‍ये अ‍ॅप्‍सच्‍या माध्‍यमांतून करत आहेत संघटनेत मुसलमान तरुणांची भरती

अन्‍सार-अल्-इस्‍लामच्‍या ३ आतंकवाद्यांना अटक

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशातील जिहादी आतंकवादी संघटना ‘अन्‍सार-अल्-इस्‍लाम’ बंगालमध्‍ये सक्रीय असल्‍याचे समोर आले आहे. या संघटनेने बंगालमध्‍ये ‘शहीद मॉड्यूल’ (स्‍थानिक गट) सिद्ध केले आहेत. आपापसांत संवाद साधण्‍यासाठी आतंकवादी अशा अ‍ॅप्‍सचा वापर करतात, जे सुरक्षा यंत्रणांच्‍या रडारवर लवकर येत नाहीत. या मॉड्यूलमध्‍ये अधिकाधिक आतंकवाद्यांचीही भरती केली जात आहे. कोलकाता पोलिसांच्‍या विशेष कृती दलाने (स्‍पेशल टास्‍क फोर्सने) ही माहिती उघड केली आहे. या दलाने अन्‍सार-अल्-इस्‍लामच्‍या ३ आतंकवाद्यांना अटक केली आहे, ज्‍यांनी चौकशीमध्‍ये त्‍यांचा उद्देश सांगितला आहे.

१. विशेष कृती दलाने २२ जून २०२४ या दिवशी महंमद हबीबुल्ला नावाच्‍या आतंकवाद्याला अटक केली होती. हबीबुल्लाला वर्धमान जिल्‍ह्यातून पकडण्‍यात आले. हबीबुल्ला ‘शहीद मॉड्युल’चा प्रमुख असल्‍याचे सांगितले जाते. चौकशीत हबीबुल्लाने त्‍याच्‍या कटांच्‍या व्‍यतिरिक्‍त त्‍याच्‍या टोळीतील साथीदारांची नावेही उघड केली. हबीबुल्लाच्‍या माहितीच्‍या आधारे कृती दलाने २५ जून या दिवशी हरेज शेख आणि २८ जून या दिवशी अन्‍वर शेख यांना अटक केली होती. या तिघांच्‍या चौकशीत हे सर्व जण बंगालमध्‍ये अंसार-अल्-इस्‍लाम या बांगलादेशी आतंकवादी संघटनेचे जाळे निर्माण करण्‍याचा प्रयत्न करत असल्‍याचे समोर आले. येथे ते त्‍याचे ‘शहीद मॉड्युल’ सिद्ध करत होते, ज्‍यासाठी तरुणांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जात होती. या सर्व आरोपींनी टेलिग्रामसह इतर काही अ‍ॅप्‍सचा वापर संवादासाठी केला. या अ‍ॅप्‍सचा सहज शोध लावला जाऊ शकत नाही.

२. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना फसवण्‍यासाठी या आतंकवाद्यांनी खोटी नावेही ठेवली होती. या आतंकवाद्यांनी त्‍यांच्‍या संभाषणात अनेक सांकेतिक शब्‍दही वापरले आहेत, ज्‍यांचा पोलीस उलगडा करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. इंटरनेटच्‍या माध्‍यमातून हे आतंकवादी जिहादी विचारसरणीच्‍या तरुणांना ओळखायचे आणि नंतर त्‍यांच्‍याशी बोलायचे. हबीबुल्ला भारतात ही संघटना चालवायचा. सर्वांनी त्‍याच्‍या सूचनांचे पालन केले. सध्‍या बंगाल पोलीस त्‍यांच्‍या जाळ्‍याची पाळेमुळे भारतात किती खोलवर रुजली आहेत, हे शोधण्‍यात व्‍यस्‍त आहेत.

३. अंसार-अल्-इस्‍लाम संघटनेवर बांगलादेशात बंदी आहे. जून २०२४ मध्‍ये बांगलादेश पोलिसांनी या संघटनेच्‍या ३ आतंकवाद्यांना कॉक्‍स बाजार येथून अटक केली होती. महंमद झकारिया, महंमद नियामत उल्लाह आणि महंमद ओझैर अशी त्‍यांची नावे आहेत. या सर्वांचे वय सुमारे २० वर्षे आहे. या टोळीचे लोक अफगाणिस्‍तानात कार्यरत असलेल्‍या तालिबानला आदर्श मानतात.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी आतंकवादी संघटना भारतात घुसखोर बांगलादेशी मुसलमानांची भरती करून देशात आतंकवादी कारवाया घडवून आणतील, यात शंका नाही ! यातून तरी भारताला घुसखोरांच्‍या उपद्रवाची कल्‍पना येऊन त्‍यांना तातडीने हाकलण्‍याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा !