कोल्हापूर शहरात खुलेआम चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा ! – शिवसेना महिला आघाडीचे निवदेन

अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांना निवेदन देतांना शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी शिंगणापूर परिसरात २ बांगलादेशी महिलांना आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले होते. या महिला पारपत्राविना अनेक महिन्यांपासून वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. त्याच अनुषंगाने ‘व्हिनस कॉर्नर’ येथे व्यवसाय करणार्‍या वारांगनामध्येही काही बांगलादेशी, नेपाळी महिलांचा सहभाग दिसून येतो. या महिलांमुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी कोल्हापूर शहरात खुलेआम चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांना देण्यात आले.

या प्रसंगी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगर समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, मंगलताई कुलकर्णी, नम्रता भोसले, पूजा कामते यांसह अन्य उपस्थित होत्या.

१. शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या ‘व्हिनस कॉर्नर’ रस्त्यावरील वारांगनांना पोलीस प्रशासनाच्या कह्यात देण्यात आले. हा प्रमुख मार्ग शहरातून कोकणास जोडणारा, श्री महालक्ष्मीदेवी देवस्थानकडे जाणारा, तसेच बसस्थानकाकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून फिरतांना शहरातील घरंदाज महिलांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे.

२. दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणार्‍या करवीरनगरीत श्री महालक्ष्मीदेवी, श्री जोतिबा, नृसिंहवाडी यांसह अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक कोल्हापूर येथे भेट देतात.

३. असे असतांना गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात राजरोस खून, दरोडे, खुनी आक्रमण, मारामारी, गांजा, वेश्या व्यवसाय यांसारखे अवैध धंदे खुलेआम चालू असून यामुळे कोल्हापूर शहराची अपकीर्ती होत आहे. शहरात अनेक ठिकाणी ‘मसाज पार्लर’च्या नावावर अवैध व्यवसाय चालू असून त्यांचीही पडताळणी होणे आवश्यक आहे.