पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे, तर दहावीच्या परीक्षेसाठी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर घोषित करणे, या गोष्टींचा सारासार विचार करता वर्ष २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा
८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षांचे दिनांक घोषित करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.