दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक !; पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !…

अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक !

भाईंदर – देशभरात अमली पदार्थाची निर्मिती करून त्यांची विक्री करणार्‍या मोठ्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये एकूण ३२७ कोटींचा साठा जप्त करून १५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ही टोळी आंतरराष्ट्रीय आतंकवादी (कुप्र्रसिद्ध) दाऊद इब्राहिमचा प्रमुख सलीम डोळा चालवत होता. शोएब मेमन आणि निकोलस यांना यात अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका : समाजाला व्यसनाधीन करणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !


पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !

वसई – विरार रेल्वेस्थानकाच्या पादचारी पुलावर २७ वर्षांच्या महिलेवर तिच्या पतीने चाकूने प्राणघातक आक्रमण केले. ती गंभीर घायाळ झाली असून सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी पती शिव शर्मा याला कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका : नातेसंबंध संपुष्टात आल्याचे उदाहारण !


ट्रेलरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मत्यू !

बोईसर – येथे ट्रेलरने २ शाळकरी विद्यार्थांना चिरडले. यात १४ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून विद्यार्थिनी घायाळ झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला कह्यात घेतले आहे.


सरकारी योजनेसाठी पैसे घेणारा तलाठी निलंबित !

अमरावती – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत वरूड येथे तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी अर्जदार महिलांकडून पैसे घेतले. या प्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे.


खारघर येथे भव्य फलक कोसळला !

खारघर – येथे रस्त्यालगत लावलेला एक भव्य फलक खाली कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही; परंतु एक वाहन आणि बैलगाडी यांची हानी झाली. पनवेल महापालिका आयुक्तांनी या घटनेनंतर पालिका क्षेत्रातील सर्वच फलकांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.


पीक विमा योजनेसाठी केवळ १ रुपया देण्याचे शेतकर्‍यांना आवाहन !

मुंबई – पीक विमा योजनेसाठी अर्ज भरतांना शेतकर्‍यांनी प्रतिअर्ज केवळ १ रुपया शुल्क द्यावे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सी.एस्.सी. (C.S.C.) केंद्रामध्ये भरू नये. १ रुपयाहून अधिक शुल्काची मागणी केली गेल्यास शेतकर्‍यांनी टोल फ्री क्रमांक ४४११ / १८००१८००४१७ किंवा ०२२-४१४५८१९३३ अथवा ०२२-४१४५८१९३४ या दूरभाष क्रमांकावर अथवा ९०८२९२१९४८ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, तसेच [email protected] या ई-मेल पत्त्यावर तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.