पलूस (जिल्हा सांगली) – महाराष्ट्र शासनाच्या ‘एकात्मिक बालविकास योजने’च्या अंतर्गत गर्भवती माता आणि बालके यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. या आहारात डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारा संच देण्यात येतो. हा पोषण आहार माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी त्यांचा नातू शिरीष याच्यासाठी घरी नेला होता. घरी गेल्यावर या आहाराचा संच उघडल्यावर त्यांना त्यात मृत सर्प आढळून आला. जाधव यांनी ही माहिती त्वरित अंगणवाडी सेविकांनी दिली. यानंतर हे वाटप तातडीने स्थगित करण्यात आले.
या संदर्भात पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. ‘पोषण आहारात मृत सर्प आढळणे ही गंभीर गोष्ट असून यामुळे गर्भवती महिला आणि लहान बालके यांच्या जिवाशी खेळ होत आहे, हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे. यातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकापोषण आहारात मृत सर्प आढळतो, म्हणजे संबंधित अधिकारी आहाराची पडताळणी करत नसल्याचेच उघड होते ! |