Pakistan Terrorist Escape : भारताला हवा असलेला आतंकवादी पाकिस्तानच्या कारागृहातून पसार !

पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट जिल्हा कारागृह

इस्लामाबाद  – भारताला हव्या असणार्‍या आतंकवाद्यांपैकी एक असलेला गाझी शहजाद हा आतंकवादी पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट जिल्हा कारागृहातून पळून गेला आहे. या घटनेत इतर १९ बंदीवानही पसार झाले आहेत. गाझी शहजाद हा प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असून  त्याला भारताने ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले आहे.

बंदुकीच्या जोरावर बंदीवानांनी कारागृह रक्षकाला कह्यात घेतले आणि त्याच्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या. पळून जाण्याची योजना आखलेल्या बंदीवानांनी मुख्य द्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना वेठीस धरले. या वेळी पळणारे बंदीवान आणि सुरक्षारक्षक यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारात खय्याम सईद या बंदीवानाचा मृत्यू झाला.

स्थानिक पोलीस प्रमुख रियाझ मुघल यांनी सांगितले की, पळून गेलेल्या बंदीवानांचा शोध चालू आहे. या प्रकरणी काही कारागृह अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे, तर काहींना बडतर्फ करण्यात आले आहे.