लोणावळा येथील भुशी डॅम दुर्घटना
मुंबई, १ जुलै (वार्ता.) – लोणावळा येथे ३० जून या दिवशी भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील १० जण वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली. यापैकी ५ जणांना वाचवण्यात यश आले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेसह ४ लहान मुलांचा समावेश आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर नोंद घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकार्यांच्या त्यांच्या त्यांच्या विभागातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
पावसाळी पर्यटनात अशा घटना घडू नयेत, पर्यटक सुरक्षित रहावेत, यासाठी सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच ‘पर्यटनाच्या ठिकाणी जीवनरक्षक तैनात करा. कार्डिक रुग्णवाहिका ठेवा. ‘एस्.डी.आर्.एफ्.’चे पथक तैनात करा’, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनाही यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. मुंबई येथील समुद्रकिनारे सुरक्षित करा’, असे त्यांनी सांगितले. ‘पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या; पण आपल्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालू नका. धोक्याच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करू नका’, असे आवाहन शिंदे यांनी केले.