अनंत बल, धैर्य आणि उत्साह असेल, तरच महान कार्ये संपादिता येतील !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

स्वामी विवेकानंद

मित्रा ! केवळ आत्माच सर्वांहून श्रेष्ठ आहे, जडद्रव्य नव्हे. स्वतःला देहच समजणारे अज्ञानी लोक ‘आम्ही दुर्बल आहोत, आम्ही दुर्बल आहोत’, अशा करुण स्वरात आक्रोश करत असतात. आपल्या देशाला आज आवश्यकता आहे साहसाची आणि त्यासमवेतच वैज्ञानिक प्रतिभेची ! आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! बायकीपणा आणि नामर्दपणा मुळीच उपयोगाचा नाही. जो प्रत्यक्ष कार्य करतो आणि ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, त्याच्याचपाशी लक्ष्मी जात असते. मागे वळून पाहू नका, पुढे पाऊल टाका, पुढे पुढे चला ! अनंत बल, अनंत उत्साह, अनंत धैर्य आणि अनंत धीर हेच आपल्याला हवे आहेत. हे असतील, तरच महान कार्ये संपादिता येतील.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)