‘भारत तालिबानला पैसे देऊन पाकमध्‍ये आतंकवाद्यांना ठार करत आहे !’ – सारा अ‍ॅडम्‍स, ‘सी.आय.ए.’च्‍या माजी महिला अधिकारी

अमेरिकेची गुप्‍तचर संस्‍था ‘सी.आय.ए.’च्‍या माजी महिला अधिकार्‍याचा फुकाचा दावा !

सारा अ‍ॅडम्‍स

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – पाकिस्‍तानमध्‍ये अज्ञातांकडून भारतामध्‍ये आतंकवादी कारवाया करणार्‍यांच्‍या हत्‍या केल्‍या जात आहेत. या कारवाया भारताची गुप्‍तचर संस्‍था करत असल्‍याचा आरोप पाकिस्‍तान करत आहे. भारताने पाकिस्‍तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. आता अमेरिकेची गुप्‍तचर संस्‍था ‘सी.आय.ए.’च्‍या माजी अधिकारी सारा अ‍ॅडम्‍स यांनी दावा केला आहे की, तालिबान भारताच्‍या सांगण्‍यावरून या हत्‍या करत आहे. भारत यासाठी तालिबानला पैसे देत आहे.

‘शॉन रायन शो’मध्‍ये बोलतांना सारा अ‍ॅडम्‍स यांनी म्‍हटले की,

१. मी अफगाणिस्‍तानमध्‍ये अमेरिकेचे पैसे शोधत होते. त्‍यानंतर भारत मुल्ला दाऊद  नावाच्‍या व्‍यक्‍तीला काही पैसे देतो, असे समोर आले. हा पैसा ‘बलुचिस्‍तान लिबरेशन आर्मी’ आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्‍तान’ या संघटनांना पाकिस्‍तानला त्रास देण्‍यासाठी दिला जातो. हे सर्व चालू आहे, जे आपल्‍याला ठाऊक आहे; पण नंतर आम्‍ही कल्‍पनाही करू शकत नव्‍हतो, असे काही ऐकले. आम्‍ही ऐकले की, भारताने मुल्ला याकूब याला १ कोटी डॉलर्स (८३ कोटी ३६ लाख रुपये) दिले आहेत. आम्‍ही विचार करत होतो की, तो त्‍याचे काय करेल ?

२. भारताची गुप्‍तचर संस्‍था तालिबानचा सर्वोच्‍च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याच्‍या वैयक्‍तिक सुरक्षेसाठी निधी पुरवत होती. ती का पुरवत होती ?, हा माझ्‍यासाठी चिंतेचा विषय होता. हे आश्‍चर्यकारक नाही का ? आम्‍ही (अमेरिका) अफगाणिस्‍तानमध्‍ये जो पैसा  खर्च करत होतो त्‍या तुलनेत ही रक्‍कम फार मोठी नव्‍हती. यातून भारताला काय मिळत आहे ?, ही विचार करण्‍याची गोष्‍ट होती. पाकिस्‍तानमधील काश्‍मिरी आतंकवाद्यांना ठार करण्‍यासाठी भारत तालिबानचा वापर करत होता.

३. मी शपथ घेते. मला ठाऊक आहे की, माझी विधाने अनेक प्रश्‍न उपस्‍थित करत आहेत;  पण तालिबानी यंत्रणेमुळे पाकिस्‍तानात लाहोर, कराची इत्‍यादी ठिकाणी हत्‍या होत आहेत.

कोण आहे मुल्ला याकूब ?

मुल्ला याकूब तालिबान सरकारमध्‍ये संरक्षणमंत्री आहे. याकूब तालिबानचा नेता मुल्ला उमर याचा मुलगा आहे.

संपादकीय भूमिका 

अमेरिका भारताचा मित्र होऊ शकत नाही, हे अशा प्रकारच्‍या आरोपांतून परत परत सिद्ध होत आहे !