वारी

आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान आहे. त्या निमित्ताने…

वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशांमध्ये प्रचलित असलेला एक वैष्णव संप्रदाय आहे. ‘वारी करणारा तो वारकरी’ होय. ‘वारी’ शब्दाच्या अनेक व्युत्पत्या अनेक विद्वानांनी दिल्या आहेत. ‘वारी’ हा शब्द ‘फेरी’ किंवा ‘खेप’ या अर्थाने अभिप्रेत आहे.
प्रतिवर्षी अथवा प्रत्येक मासात नियमितपणे एखाद्या पवित्र स्थळीच्या यात्रेला ‘वारी’ असे म्हणतात.
वारकर्‍यांच्या संदर्भातील मुख्य पवित्र स्थळ म्हणजे ‘पंढरपूर’ ! आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या प्रमुख ४ वार्‍या आहेत. शं. वा. दांडेकर म्हणतात, ‘‘आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यांपैकी एका शुक्ल एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून जो नियमाने पंढरपुरास जातो, तो पंढरपूरचा वारकरी होय ! त्याच्या उपासनेचा मार्ग ‘वारकरी पंथ’ होय.’’

 वारीचे अधिष्ठान

संत ज्ञानदेवांच्या आधीपासून वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता; मात्र या पंथाला तात्विक आणि आध्यात्मिक अधिष्ठान ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. ‘राम कृष्ण हरि’ हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. पंढरपूर आणि आळंदी अशा दोन वार्‍या वारकरी संप्रदायात चालतात. पंढरीची वारी सर्वांत महत्त्वाची ! ती आषाढ शुक्ल एकादशी ही होय. आळंदीच्या वारीचा दिवस कार्तिक कृष्ण एकादशी हा आहे. आषाढीच्या वारीस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरीस येते. आषाढी-कार्तिकी या वार्‍यांना प्रत्येक फडावर दशमी ते पौर्णिमा भजने आणि कीर्तने होतात. रात्री हरिजागर असतो. पौर्णिमेस सर्व दिंड्या पंढरपुरापासून जवळ असलेल्या गोपाळपुरीस जातात. तिथे काला होतो. काल्याच्या लाह्या एकमेकांच्या मुखी घालून वारकरी आपल्या वारीची सांगता करतात. या वेळी स्पृश्य-अस्पृश्य भेद मानला जात नाही. आळंदीच्या वारीस पंढरीहून संत नामदेव आणि संत पुंडलिक या संतांच्या पालख्या अन् दिंड्या येतात. भजन, कीर्तन, हरिजागर हे सोहळे होतात. कार्तिक कृष्ण त्रयोदशी हा ज्ञानेश्वरांचा समाधीदिन होय. या दिवशी समाधीची भजने म्हटली जातात आणि काला होतो. देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, सासवड इत्यादी संतसंगी त्या त्या संतांच्या पुण्यतिथीला नियमाने जाणारेही वारकरी असतात.


वारकरी संप्रदाय

‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ।।’ म्हणजे संत नामदेव महाराज म्हणतात, ‘‘वर्षातील प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मला भेटण्यासाठी पंढरीला या. त्या दिवशी मला विसरू नका, असे पांडुरंग आपल्या सर्व भक्तांना प्रेमळपणे सांगत आहे.’’

‘आषाढी आणि कार्तिकी वारीला मला विसरू नका’, असे पांडुरंग आपल्या भक्ताला सांगतो. यावरून स्वतः पांडुरंगाला त्याच्या भक्तांच्या भेटीची ओढ लागते, हे अधोरेखित होते. गेली जवळजवळ १० शतके पंढरपूरच्या वारीने समाजमनाला भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांची वैचारिक पृष्ठभूमी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, समग्र भारतवर्षात पांडुरंगाचे भक्त आढळतात.

वारीमागील भक्तीयोग

संत ज्ञानेश्वरांनी गोड शब्दांत सांगितलेला वारी मागील भक्तीयोग –

जें जें भेटे भूत ।
तें तें मानिजे भगवंत ।

हा भक्तियोगु निश्चित ।
जाण माझा ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ११८

अर्थ : भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे’, असे समजावे. हा माझा भक्तीयोग आहे, असे निश्चित समज !

भक्तीची व्याख्या : भक्तीची याहून सुटसुटीत व्याख्या आजवर कुणी केली नसावी. जी व्यक्ती भेटेल, जे ‘भूत’ अर्थात् प्राणी, पक्षी, लता, वेली, जड, चेतन वस्तू त्यात परमेश्वर विराजमान आहे, हे  मनात ठसवणे, म्हणजे भक्ती !

(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१९)