Siddaramaiah’s Appeal : कर्नाटकमध्‍ये रहाणार्‍या प्रत्‍येकाने राज्‍यात कन्‍नड वगळता इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, अशी शपथ घ्‍यावी ! – मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या

कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांचे आवाहन !

मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्‍ये रहाणार्‍या प्रत्‍येकाने कन्‍नडमध्‍येच बोलण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्‍नड वगळता इतर कोणतीही भाषा राज्‍यात बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्‍यावी, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी केले. कर्नाटक विधीमंडळाच्‍या पश्‍चिम द्वाराजवळ उभारण्‍यात आलेल्‍या नाददेवी भूवनेश्‍वरी मातेच्‍या पुतळ्‍याचे उद़्‍घाटन करत असतांना ते बोलत होते.

मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या पुढे म्‍हणाले की, कन्‍नड लोक उदार असल्‍यामुळेच, ‘कन्‍नड भाषा येत नसली, तरी इतर भाषा बोलून आपण कर्नाटकमध्‍ये राहू शकतो’, असे वातावरण निर्माण झाले आहे. हीच परिस्‍थिती तुम्‍हाला तमिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा केरळ या राज्‍यांत दिसणार नाही. तिथे केवळ त्‍यांच्‍या मातृभाषेत संवाद साधला जातो. त्‍यामुळे आपणही आपल्‍याच मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. हीच आपल्‍यासाठी अभिमानाची गोष्‍ट असेल. कर्नाटकमध्‍ये कानडी वातावरण निर्माण करणे, हे आपल्‍या सर्वांचे दायित्‍व आहे. त्‍यामुळे येथे रहाणार्‍या सर्वांनीच कन्‍नडमध्‍ये बोलले पाहिजे. कन्‍नड भाषेबद्दल जिव्‍हाळा वाढला पाहिजे. कन्‍नड भाषेसमवेतच आपला देश, आपली भूमी याबद्दलही प्रत्‍येकाने अभिमान बाळगायला हवा, अशीही अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

संपादकीय भूमिका

  • देशात भाषावार प्रांतरचना झाल्‍यानंतर प्रत्‍येकाने तो ज्‍या राज्‍यात रहातो तेथील राजभाषा शिकली आणि बोलली पाहिजे, अशी किमान अपेक्षा बाळगणे कधीही चुकीचे ठरणार नाही; मात्र तो अट्टहास असू शकत नाही आणि कुणावर अत्‍याचार करण्‍याचे कारण असू शकत नाही.  
  • महाराष्‍ट्रात मराठीच्‍या संदर्भात अशी मागणी करणार्‍यांना काँग्रेसकडून नेहमीच विरोध केला जात असतांना आता काँग्रेसवाले सिद्धरामय्‍या यांच्‍या या विधानावर तोंड का उघडत नाहीत ?