राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांचे होणार खासगी लेखापरीक्षण !

मुंबई, २० जून (वार्ता.) – राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांची मागणी, पुरवठा आणि गोदामातील शिल्लक साठा यांचे यापुढे खासगी लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केले जाणार आहे. यापूर्वी शासकीय गोदामांचे लेखापरीक्षण पुरवठा आयुक्तांद्वारे केले जात होते. यापुढे मात्र या कामासाठी खासगी लेखापरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. वर्षातून एकदा हे लेखापरीक्षण केले जाणार असून त्यासाठी एका गोदामाच्या लेखापरीक्षणासाठी शासनाने १७ सहस्र ७०० रुपये निश्चित केले आहेत. निविदा प्रक्रियेद्वारा लेखापरीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी सरकारने १ कोटी ५९ लाख ३० सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे. लेखापरीक्षणाचा करार २ वर्षांसाठी करण्यात येणार आहे.