अल्पवयीन मुलांच्या विरोधात बाल न्याय मंडळामध्ये अन्वेषण अहवाल सादर

कल्याणीनगर (पुणे) येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण

पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलांच्या विरोधात २०० पानी अंतिम अन्वेषण अहवाल ‘बाल न्याय मंडळा’कडे सादर केला आहे. रक्ताचे नमुने पालटून पुरावा नष्ट करणे, या कटामध्ये अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणांमध्ये कलमांची वाढ केली आहे, तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींच्या विरोधात पोलिसांनी ९०० पानी आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयामध्ये प्रविष्ट केले आहे. हे दोन्ही अहवाल २६ सप्टेंबर या दिवशी सादर करण्यात आले.

कल्याणीनगर भागात १९ मे या दिवशी ‘पोर्शे’ कार अपघातांमध्ये एक युवक आणि युवती यांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त ‘पोर्शे’ कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी शिवानी यांनी ‘ससून’मधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर यांना पैसे देऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुलाने मद्यप्राशन केल्याचा संशय असल्याने रक्ताचे नमुने पडताळणीसाठी ‘ससून’मध्ये पाठवले होते. त्या वेळी मुलाऐवजी त्याची आई शिवानी यांनी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले होते. हा प्रकार अन्वेषणातून उघडकीस आला. आदित्य सूद आणि आशिष मित्तल यांचा जामीन अर्ज फेटाळला. अपघाताच्या वेळी ‘पोर्शे’ कारमधील अन्य २ मुलांचे रक्ताचे नमुने पालटल्याचे अन्वेषणातून निदर्शनास आले आहे. त्या प्रकरणी आदित्य सूद आणि आशिष मित्तल यांचा सक्रीय सहभाग दिसून आला होता. सध्या ते येरवडा कारागृहामध्ये असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळ्यात आला आहे. या दोघांनीही ‘ससून’मधील आधुनिक वैद्यांना रक्ताचे नमुने पालटण्यासाठी पैसे दिले होते.