साधकांना साधनेत सतत साहाय्य करणार्‍या आणि भावस्थितीत असणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५५ वर्षे) !

पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चरणी त्यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (सौ.) संगीता जाधव

‘पू. संगीता जाधव (आई) (सनातनच्या ७४ व्या समष्टी संत) या नात्याने माझ्या सासू (पू. आई) आहेत. माझ्या साधनेसाठी मला पू. आईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. कीर्ती प्रतीक जाधव

१. धर्मप्रसार करतांना साधकांना साधनेत साहाय्य करणे

पू. आई धर्मप्रसार करतात. त्यांच्या जिल्ह्यातील काही साधक रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येतात. काही साधक आम्हाला सांगतात, ‘‘पू. जाधवकाकूंनी आम्हाला सनातन संस्थेत आणले आणि आम्हाला साधना शिकवली. हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही.’’ हे सांगतांना साधकांची भावजागृती होते.

२. तीव्र आध्यात्मिक त्रास असतांनाही सेवा करणे

पू. आईंना तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे थकवा येतो. तेव्हा त्यांना बोलताही येत नाही. तरीही त्यांची भ्रमणभाषवरून सेवा चालू असते. याविषयी त्या एकदा त्या मला म्हणाल्या, ‘‘मी पुढच्या क्षणाला साधकांशी बोलू शकेन कि नाही?’, असे मला वाटते; परंतु बोलून झाल्यावर माझ्या लक्षात येते, ‘परम पूज्यांच्या कृपेनेच मी बोलू शकले.’’

३. कुटुंबियांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे

पू. आई मला साधनेत मार्गदर्शन करतात. आम्ही सनातनच्या वेगवेगळ्या आश्रमांत रहातो, तरीही त्या अधून-मधून आमच्या अडचणी समजून घेतात. त्या आमच्या साधनेचा आढावा घेऊन सतत मार्गदर्शन करत असतात. ‘यामुळे त्या आमच्यापासून दूर रहात आहेत’, असे वाटत नाही.

४. संत आणि गुरु यांच्याप्रती भाव असणे

पू. आईंना सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याकडून बरेच शिकायला मिळते. ‘सद्गुरु ताईंनी एखाद्या साधकाला निराशेतून किंवा अडचणीतून कसे बाहेर काढले ?’, याविषयी त्या सांगतात. पू. आईंचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती अपार भाव आहे. पू. आई सर्वांचे गुणगान करत असतात. त्या प्रत्येक प्रसंगातून भगवंताची स्तुती करत असतात. तेव्हा माझी भावजागृती होते.

माझ्या मनामध्ये असलेल्या शंकांविषयी पू. आईंशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या भावपूर्ण प्रसंगांमधून शिकायला मिळून ‘तशी स्थिती अनुभवायला हवी’, असे मला वाटते. मला योग्य दिशा मिळाल्याने अनेक दिवस विचारांच्या गुंत्यात अडकलेले माझे मन मोकळे होते आणि साधनेचे प्रयत्न आपोआप चालू होतात.

५. सतत भावस्थितीत असणे

एकदा भ्रमणभाषवर बोलत असतांना पू. आई मला साधनेविषयीची सूत्रे भावपूर्ण सांगत होत्या. तेव्हा ‘त्यांचा सहवास लाभल्याने मी किती भाग्यवान आहे ?’, असे मला वाटले. मी त्यांना म्हणाले, ‘‘पू. आई, मला तुमच्यासारखी सासू देऊन देवाने माझ्यावर किती कृपा केली आहे !’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आपला हा श्वासच देवामुळे चालू आहे. आपण दोघी जे बोलत आहोत, तेही देवामुळेच !

६. अपेक्षा घालवण्याच्या संदर्भात करायचे प्रयत्न

एकदा मी पू. आईंना ‘अपेक्षा करणे हा अहंचा पैलू कसा घालवायचा ?’, याविषयी विचारले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आपला आनंद इतरांवर अवलंबून ठेवायचा नाही. ‘समोरचा पालटेल आणि मी आनंदी होईन’, असे नसते. सर्व जण एकमेकांकडून अपेक्षा करत असतात. प्रथम आपण अपेक्षा करणे सोडून देण्यास शिकले पाहिजे. आपण अपेक्षा करत बसलो, तर आपल्यालाच दुःख मिळते. ‘आपल्याला प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून भगवंत भेटला आहे. मला केवळ इतरांना आनंद द्यायचा आहे आणि स्वतःलाही आनंद घ्यायचा आहे’, एवढेच लक्षात ठेवायचे.’’

७. इतरांना दोष देण्यापेक्षा ‘माझे प्रारब्धभोग आहेत’, असे समजणे ही गुरुकृपा !

एकदा पू. आईंनी मार्गदर्शन करतांना म्हटले, ‘आपल्याला इतरांमुळे दुःख झाले’, असे वाटणे चुकीचे आहे. कोणतीही गोष्ट इतरांमुळे होत नसते. जे काही घडते, ते आपले प्रारब्धभोग असतात. त्यामध्ये इतरांना दोष देत बसण्यात काही लाभ नाही. ‘हे माझे प्रारब्धभोग आहेत’, असे समजणे, ही गुरुकृपाच आहे.

८. भगवंतच आनंद देऊ शकतो !

व्यक्ती आपल्याशी कितीही चांगली वागली, तरी ती शेवटी आपल्याला सुखच देऊ शकते. आपल्याला आनंद केवळ भगवंत देऊ शकतो. ‘भगवंताला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ?’, हे शोधले पाहिजे. भगवंताला अपेक्षित अशी साधना केली, तरच तो आपल्याला आनंद देईल.

९. पू. आईंनी साधनेविषयी सांगितलेली सूत्रे 

अ. प.पू. डॉक्टरांची कृपा म्हणजे साधनेचा प्रकाश आहे.

आ. भाव म्हणजे आनंदाचे उंच शिखर.

‘प.पू. डॉक्टर, आपल्याच कृपेने आम्हाला पू. आईंचा सहवास लाभत आहे. तुम्ही मला माझ्या साधनेसाठी संतांचा जवळून सहवास दिलात. त्याचा मला तुम्हाला अपेक्षित असा पूर्णतः लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, फोंडा, गोवा. (४.६.२०२४)