वर्ष २०१० मधील ‘हरि विजय’ या मासिकाच्या दीपावली विशेषांकामध्ये योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे ज्येष्ठ साधक श्री. सुरेश जोशी यांनी योगतज्ञ दादाजी यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे आमच्या वाचकांसाठी प्रस्तुत केला आहे.
१. योगतज्ञ दादाजी यांच्या कार्याची व्याप्ती पुष्कळ मोठी असणे
‘योगतज्ञ दादाजी एक विराट लोहचुंबकीय शक्तीचे प्रणेते आहेत’, असे मला वाटते. प.पू. दादाजी यांचे लोककल्याणाचे कार्य अविरत चालू आहे. त्या कार्याचा आवाका इतका मोठा आहे की, ते अक्षरश: आकाशाला गवसणी घातल्याप्रमाणे आहे. त्यांच्या कार्याचे वर्णन शब्दातीत आहे. त्याला आपण उपमा देऊ शकत नाही.
२. योगतज्ञ दादाजी यांचा उत्साह आणि उमेद तरुणांना लाजवेल अशी असणे
योगतज्ञ दादाजी यांच्यामध्ये उत्साह आणि उमेद तरुण मनुष्याला लाजवण्या इतपत प्रखर आहे. ‘आपल्या दैवी कार्यात एकही चूक होणार नाही’, याची सर्वतोपरी काळजी ते स्वत: जातीने घेतात. दिवसाकाठी त्यांना विश्रांती घेण्यासाठी सवड अशी नसतेच. अव्याहत कार्य, कार्यातील विविधता त्यांच्या प्रकृतीला भावते आणि त्यातील कामाच्या बदलामुळे जो वेळ स्वाभाविक असतो, तोच विचारांना मिळणारा विश्राम. त्यांचे प्रतिदिन नवनवीन प्रयोग करणे, तसेच लहान-मोठे संकल्प अबोलपणे करणे आणि त्यांची पूर्तता करीत रहाणे, हा भाग प्रत्येक श्वासाबरोबर चालूच असतो. तेच त्यांचे जीवन असते.
३. व्यावहारिक जीवनातही नोकरी करत असतांना मजुरांची काळजी घेणे
योगतज्ञ दादाजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ‘लोकल बोर्डा’त नोकरीला होते. त्यांचे दिनमान सत्यवादी, नि:स्पृह, कष्टाळू आणि परोपकारी होते. कार्यालयाच्या कामात योगतज्ञ दादाजी यांचा हात धरणारे दुसरे कुणी नव्हते. दीन (गरीब) मनुष्याबद्दल त्यांच्या मनात कणव सहज उभी रहायची. एखाद्या मजुराला बरे नसेल किंवा त्याला ताप आला असेल, तर प.पू. दादाजी त्याच्या कामाचे नियोजनच असे करत की, त्या मजुराचा खाडा (रजा) न होता, त्याला हलकं फुलकं काम आणि पूर्ण वेतन मिळेल. त्यातून त्या मजुराला ज्वर (तापजाळ) अधिक असेल, तर प.पू. दादाजी कार्यालयातील कामकाज करत त्याला स्वत:च्या जवळच ठेवत जेणेकरून त्याच्याकडे लक्ष देता येईल. प.पू. दादाजी गरजूंना औषधपाणी विनामूल्य करायचे.
प.पू. दादाजी यांचे वडील प्रख्यात वैद्यकीय शास्त्रात निपुण असल्यामुळे वारसा हक्काने जणू दादाजींना पुष्कळ गावठी औषधे ज्ञात असायची.
४. संकटनिवारणासाठी येणार्या व्यक्तींचे आदरातिथ्य व्यवस्थित करणे
प.पू. दादाजी यांचे विषयाला धरून बोलणे, तसेच शब्दोच्चार मृदू असल्यामुळे समोरची व्यक्ती कधी कटू होतच नसे. प.पू. दादाजी यांच्याकडे संकटनिवारण करण्यासाठी बरेच लोक येत असत. आलेल्या व्यक्तींची ऊठबस ते स्वत: जातीने करायचे. आरंभीच्या काळात त्यांच्या कार्याची, म्हणजे उपचार करण्याच्या कार्यकारिणीची पद्धत अशी होती की, प.पू. दादाजींकडे आलेली माणसे एक रात्र त्यांच्याकडे रहायची. त्या वेळी तर दादाजींना पुष्कळ त्रास सहन करावा लागायचा. काही वेळा तर त्यांची जेवणाखाण्यासह ऊठबस करावी लागायची, म्हणजे घरातील सगळ्यांनाच परिश्रम पडायचे. संकट-निवारणापलीकडे जाऊन प.पू. दादाजी सेवाभावाने आणि गोड शब्दांनी त्यांची मने जिंकायचे. दुसर्या दिवशी त्यांची पाठवणी करतांना त्यांना चार अनंताची फुले पानात बांधून त्याची पुडी करून द्यायचे. प.पू. दादाजी यांचे बदलापूरला वास्तव्य असेपर्यंत ते स्टेशनपर्यंत पाहुण्यांना सोडायला स्वत: जातीने जायचे. त्यामुळे प.पू. दादाजी त्यांचे नातेवाईक असल्याप्रमाणे सर्वांच्या मनात जवळची जागा करायचे.
५. सर्वांशी प्रेमाने वागणे
विशेष म्हणजे प.पू. दादाजी यांचा आतापर्यंत कुणाशीही मोठ्या स्वरात शब्दाला शब्द नाही, वादंग नाही, भांडण तर नाहीच नाही. प.पू. दादाजी यांना एखाद्याचे विचार किंवा वागणे पटले नाही, तरी त्याच्याशी वागण्यात त्यांच्यात लेशमात्रही पालट जाणवत नसे. एखाद्याला समज द्यायची असल्यास ते सौम्य आणि योग्य शब्दांत देत असत.’
– श्री. सुरेश जोशी, बोरीवली, मुंबई.
(साभार : ‘मासिक हरि विजय’ दीपावली विशेषांक, वर्ष २०१०)