भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे यांनी केलेले मार्गदर्शन

मनुस्‍मृति जाळणे अत्‍यंत चुकीचे आणि निषेधार्ह !

पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे

आज जे मनुस्‍मृति जाळतात, ते अत्‍यंत चुकीचे आहे. ते जाळणार्‍यांची मनुस्‍मृति आणि मनु यांच्‍याविषयी बोलण्‍याची पात्रता नाही. खरे तर मनुस्‍मृति जाळणार्‍यांना वैध मार्गाने विरोध करायला हवा. मनुस्‍मृतीमध्‍ये ‘स्‍त्रीशी कसे वागावे ? तिचा आदर-सन्‍मान कसा करावा ? कायद्याचे राज्‍य कसे असावे ?’, यांविषयी मार्गदर्शन केले आहे. असे असतांना ती जाळणे अत्‍यंत चुकीचे आहे.

 विश्‍वाची उत्‍पत्ती १२ कोटी ९ लाख ६० सहस्र वर्षांपूर्वी झाली !

हे विश्‍व कधी निर्माण झाले ? हे ब्रिटीश किंवा विदेशी कुणीही सांगू शकत नाहीत. ते म्‍हणतात, ‘माकडापासून मानवाची उत्‍पत्ती झाली’; पण त्‍यांचे असे म्‍हणणे, हे त्‍यांचे आत्‍मचरित्र आहे; कारण प्रभु श्रीराम, श्रीकृष्‍ण, सर्व ऋषिमुनी हे सर्व मनुष्‍यच होते, मग आपली उत्‍पत्ती माकडापासून कुठे झाली ? सत्‍ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या ४ युगांचे मिळून एक युग होते अन् या युगांची एकूण बेरीज ४३ लाख २० सहस्र होते, अशी २८ युगे श्री विठ्ठल विटेवर उभा आहे. यावरून आपल्‍या लक्षात येईल की, विश्‍वाची उत्‍पत्ती १२ कोटी ९ लाख ६० सहस्र वर्षांपूर्वी झाली आहे.