महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक स्तरावरील संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना ३० वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनाच्या आधारावर करण्यात आली आहे. या विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ‘सूक्ष्म-जगत् आणि आध्यात्मिक स्पंदने यांचा मानवाच्या जीवनावर होणारा परिणाम’, यांच्या संदर्भात येथे संशोधन केले जाते.

१. अध्यात्मशास्त्रातील विविध पद्धतींच्या परिणामकारकतेविषयी चालू असलेले संशोधन

‘प्रार्थना, नामजप, मंत्रजप, प्राणायाम, आसन, बंध, मुद्रा, न्यास, आध्यात्मिक यंत्रे (उदा. श्रीयंत्र), यज्ञ, कुंडलिनीचक्रे, तसेच विविध योगमार्ग यांचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास अन् आध्यात्मिक प्रगती यांच्या संदर्भात कोणता लाभ होतो ?’, याचे सहस्रो व्यक्तींवर संशोधन करण्यात येत आहे, उदा. ‘शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी नामजप योग्य उच्चारासह कसा करावा ?’, ‘मनुष्याला आध्यात्मिक त्रास कसा होतो आणि त्यावर उपाय काय ?’, ‘धार्मिक विधी, सण-उत्सव-व्रते, यज्ञयाग इत्यादींतून चैतन्याची प्राप्ती कशी होते ?’, ‘श्री गणपति अथर्वशीर्षाच्या पठणामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ आणि त्याचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम’ इत्यादी.

२. मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूने बुद्धीअगम्य घटनांच्या संदर्भात चालू असलेले संशोधन !

२ अ. पंचमहाभूतांच्या माध्यमातून घडणार्‍या सूक्ष्मातील अद्वितीय चांगल्या घटना : सनातनच्या आश्रमात ठिकठिकाणी विविध दैवी गंध येणे; आश्रमातील विविध लाद्यांमध्ये प्रतिबिंब दिसणे; आश्रमातील खिडक्यांच्या काचांतून पाण्यातील लाटांत दिसते, तसे पलीकडील दृश्य दिसणे; आश्रमातील खोल्यांच्या पांढर्‍या भिंती, तसेच अन्य वस्तू यांच्या रंगांमध्ये पालट होणे; खोल्यांतील तापमान वाढणे किंवा न्यून होणे; खोल्यांतील, तसेच देवतांच्या चित्रांतील प्रकाश वाढणे; आश्रमाजवळच्या रस्त्यावरील विजेचा दिवा, सूर्य आणि चंद्र यांच्यातून किरण अन् प्रकाशाची वर्तुळे प्रक्षेपित होत असल्याचे आणि त्यांमध्ये सप्तरंग दिसणे; लाद्या गुळगुळीत होणे; सूक्ष्म नाद ऐकू येणे; खोलीचे आकारमान वाढून खोली भव्य वाटणे; आश्रमातील लाद्यांवर अन् अन्य ठिकाणी आपोआप ‘ॐ’ उमटणे; दैवी कण मिळणे, यांसारख्या सहस्रो विषयांच्या संदर्भात वर्ष १९८५ पासून संशोधन चालू आहे.

२ आ. पंचमहाभूतांच्या द्वारे अनिष्ट शक्तींनी विविध माध्यमांतून केलेली आक्रमणे : भांड्यांवर डाग पडणे, भिंतीवर आणि अन्य ठिकाणी आसुरी चेहरे अन् आकृत्या उमटणे अन् त्यांची हालचाल झाल्याचे जाणवणे, रक्ताचे डाग पडणे, लाद्या, भिंती आणि माझी पाठ यांवर ओरखडे येणे, विविध त्रासदायक आवाज ऐकू येणे यांसारख्या सहस्रो विषयांच्या संदर्भात संशोधन चालू आहे.

३. सहा वेदांगांपैकी ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात आध्यात्मिक स्तरावर सखोल संशोधन

संत, आध्यात्मिक त्रास असणारे साधक, आध्यात्मिक पातळी चांगली असणारे साधक, दैवी बालके, महामृत्यूयोग आणि आपत्काळ यांसंदर्भात ग्रहांचा अभ्यास करण्यात येत आहे. यात हस्तरेषा, पादरेषा, कुंडली अभ्यास, अष्टकवर्ग, रत्नशास्त्र, अंकशास्त्र आणि नाडीपट्टी यांविषयी सखोल संशोधन चालू आहे, उदा. विवाह ठरवतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व, हातांवरील तळरेषा पालटण्याविषयीचे संशोधन इत्यादी.

४. आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचा शोध लागणे

‘वाईट शक्ती’ या विषयावर माहिती देणारी जगात अनेक संकेतस्थळे आहेत; पण वाईट शक्तींच्या त्रासांवर पुढच्या पुढच्या स्तराच्या, तसेच मूलगामी उपायपद्धती तेथे सांगितलेल्या नाहीत. मी वाईट शक्तींच्या संदर्भात सतत चालू ठेवलेल्या अभ्यासामुळे पुढच्या पुढच्या स्तराच्या उपायांच्या नवनवीन पद्धतींचा शोध लागला. या पद्धतींची माहिती पुढे दिली आहे.

४ अ. देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे उपाय : यात रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या चारही बाजूंना सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे मंडल घालणे, वास्तूशुद्धीसाठी वास्तूमध्ये सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे छत सिद्ध करणे आदी उपायांचा समावेश आहे.

४ आ. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी देवतांची सात्त्विक चित्रे किंवा नामजप-पट्ट्या लावणे

४ इ. पंचतत्त्वांनुसार उपाय : मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांपासून (महाभूतांपासून) बनलेले आहे. त्या त्या तत्त्वाच्या (महाभूताच्या) स्तरावर उपाय केल्यास त्या तत्त्वाशी संबंधित त्रास दूर होण्यास साहाय्य होते. यासंबंधीचे विविध प्रयोग केल्यावर पुढील कृती केल्याने उपाय होतात, हे माझ्या लक्षात आले.

४ इ १. पृथ्वीतत्त्वाचे उपाय : कपाळाला सात्त्विक कुंकू लावणे, सात्त्विक अत्तराचा सुगंध घेणे इत्यादी

४ इ २. आपतत्त्वाचे उपाय : तीर्थ प्राशन करणे, खडे-मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे दोन्ही पाय बुडवून ठेवणे इत्यादी

४ इ ३. तेजतत्त्वाचे उपाय : विभूती लावणे, तुपाच्या दिव्याच्या ज्योतीकडे काही वेळ एकटक पहाणे इत्यादी

४ इ ४. वायुतत्त्वाचे उपाय : सात्त्विक वस्तूने (उदा. मोरपिसाने) व्यक्तीवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे इत्यादी

४ इ ५. आकाशतत्त्वाचे उपाय

४ इ ५ अ. निरभ्र आकाशाकडे पहाणे, खाली नामजपादी उपाय करणे

४ इ ५ आ. प.पू. भक्तराज महाराज किंवा अन्य संत यांच्या आवाजातील भजने ऐकणे

प्राणशक्तीवहन उपाय

मानवाच्या स्थूलदेहात रक्ताभिसरण, श्वसन, पचन, मज्जा इत्यादी विविध संस्था कार्यरत असतात. त्यांना कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्तीवहन संस्था पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित शरीरसंस्थेची (किंवा इंद्रियाची) कार्यक्षमता अल्प होऊन विकार निर्माण होतात. प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा कसा शोधावा, तो दूर करण्यासाठी कोणता नामजप, मुद्रा आणि न्यास करावा इत्यादींविषयी मी स्वतःवर विविध प्रयोग केले आणि उपायपद्धतीच्या परिणामांचा अनुभव घेतला. या संशोधनाचा परिपाक म्हणून ‘प्राणशक्तीवहन उपाय’ ही पद्धत अस्तित्वात आली. ही उपायपद्धत अवलंबून आज सनातनचे बरेच साधक स्वतःच स्वतःवर उपाय करण्यात सक्षम झाले आहेत.

रुग्ण दूर म्हणजे अगदी दुसर्‍या देशातही असला, तरी आध्यात्मिक पातळी चांगली असलेला साधक किंवा ‘दुसर्‍याचे त्रास दूर करण्यासाठी साहाय्य करावे’, हा समष्टी भाव असलेला साधक त्या रुग्णासाठी उपाय शोधू शकतो, म्हणजेच त्याला नामजप, मुद्रा आणि न्यास सांगू शकतो. अशा साधकाने स्वतःच्या शरिरावर उपाय केल्यास त्या रुग्णावरही उपाय होऊ शकतात. यासंदर्भातही मी स्वतः अनेक प्रयोग केले.

रिकाम्या खोक्यांचे उपाय

रिकाम्या खोक्यात पोकळी असते अन् पोकळीत आकाशतत्त्व असते. खोक्यातील आकाशतत्त्वामुळे आध्यात्मिक उपाय होतात. (या उपायपद्धतीविषयी सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ खंड)’ यात केले आहे.)

५. नामजप-उपाय

विविध प्रकारचे नामजप केल्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्यास साहाय्य होते. यासंदर्भात मी अनेक प्रयोग केले. त्यातून उपायांसाठी ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ या निर्गुणवाचक शब्दांचे जप करणे; ० ते ९ या अंकांचे जप करणे; पंचमहाभूतांचे जप आदींचा शोध लागला.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.