सध्या ‘फेडेक्स कॉलर’ याद्वारे करण्यात येणारा घोटाळा

गेल्या काही दिवसांपासून मला एका दूरभाषवरून माझ्या भ्रमणभाषवर संपर्क येतो. जेव्हा मी भ्रमणभाषवर तो संपर्क घेतो, तेव्हा ‘आपले फेडेक्स पार्सल (फेडेक्स कुरिअर) वाट पहात आहे. ते घेण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर दूरभाष करा’, असा ध्वनीमुद्रित केलेला संदेश ऐकू येतो. त्यानंतर हा घोटाळा चालू होतो.

यानंतर ‘फेडेक्स ग्राहक सेवा कक्षा’मधून दूरभाष करत असल्याचे सांगून एका व्यक्तीचा दूरभाष येतो. ती व्यक्ती भ्रमणभाष घेणार्‍याला सांगते, ‘‘तुमच्या आधारकार्ड क्रमांकाशी जोडलेले एक पार्सल आहे आणि त्यामध्ये अवैध वस्तू असल्याने ते जप्त करण्यात आले आहे.’’ पीडित व्यक्तीला अशा प्रकारचे कोणतेही पार्सल ठाऊक नसतांनाही दूरभाष करणारी व्यक्ती सांगते, ‘‘ते पार्सल मुंबईहून पाठवण्यात आले असून त्यामध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. सध्या ते पार्सल ‘सीमा शुल्क कार्यालया’त अडकले आहे.’’ ‘स्वतःच्या आधारकार्डचा वापर भारताबाहेर अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी केला जात आहे’, असे समजून पीडित व्यक्ती एकदम भांबावून जाऊन तिच्या मनात भीती निर्माण होते.

‘हे प्रकरण अत्यंत तातडीचे आहे’, असा आभास निर्माण करून ‘हा ‘कॉल’ (संपर्क) मुंबई पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडे (संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करून केल्या जाणार्‍या गुन्ह्यांचे अन्वेषण करणारे पोलिसांचे पथक) हस्तांतरित करतो’, असे सांगते. जेव्हा पीडित व्यक्ती ‘आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार करण्यास जातो’, असे सांगते, तेव्हा ती व्यक्ती ‘हा गुन्हा मुंबईत घडला असल्याने मुंबई पोलीस ठाण्याच्या अधिकाराखाली येतो. त्यामुळे तुम्हाला तक्रार करण्यासाठी ते मुंबईला संपर्क करायला सांगतील’, असेही सांगते. ती दूरभाष करणारी व्यक्ती पीडित व्यक्तीचा संपर्क ‘मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करत आहे’, असे सांगते. त्यानंतर स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवणार्‍या व्यक्तीकडे संपर्क हस्तांतरित करण्यात येतो. तो तथाकथित पोलीस अधिकारी पीडिताला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकृत ‘स्काईप’ किंवा ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर जायला सांगतो. यामुळे साधी भोळी पीडित व्यक्ती भीतीने समयसूचकता न दाखवता त्याचे सर्वकाही ऐकते.

त्यानंतर तो तथाकथित पोलीस अधिकारी त्या पीडित व्यक्तीकडे ‘आधारकार्ड अणि पॅनकार्ड (आयकर खात्याचे कार्ड) यांची पडताळणी करायची आहे’, असे सांगून त्यांची माहिती देण्यास सांगतो. त्या वेळी तो पीडित व्यक्तीला ‘व्हिडिओ कॉल’ करण्यास सांगून ‘त्या वेळी खोलीत कुणीही असता कामा नये’, असे सांगतो. या संपर्काद्वारे तो अधिकारी पीडित व्यक्तीचे समोरून, एका बाजूने आणि मागच्या बाजूने छायाचित्र घेत आहे’, असे सांगून व्यक्तीची जबानी घेत असल्याचा आभास निर्माण करतो.

त्यानंतर ती व्यक्ती कायदेशीर परिणामांची भीती दाखवून ‘अवैध सावकारीचा गुन्हा प्रविष्ट (दाखल) होईल’, असे सांगून पीडित व्यक्तीला पैसे हस्तांतरीत करण्यास सांगते आणि ‘तुमचे पैसे परत मिळतील’, असे आश्वासन देते. त्यानंतर ते पैसे कधीही परत मिळत नाहीत. अशा प्रकारच्या घोटाळ्यातून बेंगळुरूमधून ५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. वर्ष २०२३ मध्ये पोलिसांनी यासंबंधीच्या १६३ प्रकरणांविषयी तक्रार नोंद केली आहे.

– एक धर्मप्रेमी