पावसाळा चालू झाल्यावर वनप्रेमी-निसर्गप्रेमी ‘झाडे लावा झाडे जगवा’, ही मोहीम राबवतात. वृक्षतोड झाल्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वृक्ष लावणे खरे तर किती आवश्यक आहे ? हे सांगायला नको. केवळ झाडे लावून उपयोग नाही, तर झाडे जगवलीही पाहिजेत.
बर्याच ठिकाणी वृक्षांचे वाटप केले जाते आणि ‘एक तरी झाड लावा’, असे सांगितले जाते. झाडे लावली जातात, पावसाळ्यात ती जगतात; पण नंतर पाण्याअभावी ती मरून जातात. त्यामुळे ‘झाडे लावा झाडे जगवा’, ही मोहीम राबवतांना लावलेल्या झाडांची पूर्ण काळजी घ्यायला हवी. झाड पूर्ण मोठे होईपर्यंत आपले दायित्व आहे, या दृष्टीने पहायला हवे. त्यामुळे झाड लावतांनाच पूर्ण झाडाचे वर्षभराचे खत-पाणी देण्याचे नियोजन करावे आणि मग झाड लावावे; मात्र असे होतांना दिसत नाही.
‘झाडे लावा झाडे जगवा’, हा उपक्रम एक दिवस राबवला जातो, घोषणा दिल्या जातात, फेर्या काढल्या जातात, जनजागृती करण्यात येते. खरेतर हा विषय एवढ्यापुरता मर्यादित ठेवणे अपेक्षित नाही. झाडे लावाच; मात्र झाडे कायमस्वरूपी जगवा’, असा पालट या मोहिमेत केला पाहिजे. एखादे झाड लावल्यावर ते पूर्ण मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्यायला पाहिजे. ती कशी घ्यायची, ते येथे देत आहे.
१. त्या झाडाला नेहमीच पाणी घालण्याचे नियोजन हवे. बर्याच वेळी झाड लावल्यानंतर पावसाळ्यात त्याला पावसाचे पाणी उपलब्ध होते; पण उन्हाळ्यामध्ये झाडाला पाणी घालण्याचे नियोजन होत नसल्यामुळे ते झाड मरते.
२. झाडाला खत देणे आणि त्यांची मशागतही तेवढीच आवश्यक असते, म्हणजे झाडाची वाढ चांगली होते. झाडांची वेळोवेळी छाटणी करून त्यांना योग्य आकार देणे आवश्यक आहे.
३. वृक्षारोपण करण्यासाठी सरकारकडून बर्याच ठिकाणी रोपे, लहान झाडे यांचे वाटप केले जाते. ग्रामपंचायत आणि शहरी भागातही वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जातात. राजकारणीही लाखो झाडांचे वाटप करतात आणि मोहीम राबवतात. काही सामाजिक संघटनासुद्धा झाडेवाटप करतात; पण ते करतांना कोणत्या भागात कोणती झाडे लावायला हवीत ? त्या मातीमध्ये ते झाड चांगले वाढेल ना ? असा अभ्यास केलेला नसतो. काही ठिकाणी नारळाची झाडे वृक्षारोपणासाठी देतात. नारळ हा कोकण किनारपट्टीत चांगला वाढतो अन्य ठिकाणी त्याची वाढ हवी तशी होत नाही. असे बर्याच झाडांचे लक्षात येते.
४. आता तर बर्याच ठिकाणी ‘शो’ची झाडे दिली जातात. खरे तर आता निसर्गाला चांगली आयुर्वेदाची किंवा अधिक प्राणवायू (ऑक्सिजन) देणार्या झाडांची आवश्यकता आहे.
५. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध आजारही समोर येत आहेत. या सर्वांवर उपाय म्हणजे वृक्षांची लागवड करणे, वृक्ष वाढवणे आणि त्यांचे पूर्ण संगोपन करणे आहे, हे सर्वांना ज्ञातही आहे.
६. हिंदु धर्मामध्ये वृक्षामध्येही देव पाहिला जातो. बर्याच वृक्षांची पूजा केली जाते. त्यामध्ये देवत्व पाहिले जाते. पूर्वीच्या काळी अनेक देवतांनी वृक्षाखाली आश्रय घेतला आहे. त्यामुळे बरीच मंदिरे झाडाखालीच असतात. असे पुष्कळ महत्त्व हिंदु धर्मामध्ये वृक्षांना आहे.
७. वृक्षांमध्ये जीव असतो. आपल्या हलगर्जीपणामुळे, व्यवस्थित काळजी न घेतल्याने ते वृक्ष जगले नाहीत, तर ते एक प्रकारचे पापच आहे ना ?
८. ‘एक मूल एक झाड’, अशी बर्याच ठिकाणी संकल्पना राबवली जाते. खरे तर मुलांची जशी काळजी घेतो, तशी झाडाची आपण घेतो का ? तशी घेतली तर वृक्षांची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते
९. झाडे उत्पन्न देण्याचे साधन आहे. त्यामुळे झाडांद्वारे बर्याच प्रमाणात उत्पन्न मिळते; पण सध्याच्या काळात वेगवेगळी रसायने वापरून झाडे वाढवली जातात. त्याला लवकर फळे लागण्यासाठीसुद्धा बरीच रसायने वापरली जातात. त्यामुळे झाडांची वाढ लवकर होते, त्याची नैसर्गिक वाढ न झाल्याने, त्यांचे आयुष्यही अल्प होत आहे.
– श्री. शंकर नरूटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.६.२०२४)