पिंपरी (पुणे) येथे ‘ऑनलाईन’ आर्थिक फसवणूक करणार्‍या कोलकाता येथील टोळीला अटक !

कोलकाता येथील ‘कॉल सेंटर’वर धाड !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – ‘गुगल’वर ‘कॉलगर्ल’च्या (देहविक्री करणारी महिला) नावाने बनावट भ्रमणभाष क्रमांक नोंद करून ‘ऑनलाईन’ खंडणी मागणार्‍या कोलकाता येथील टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. ही टोळी ‘कॉल सेंटर’च्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होती. ‘कॉल सेंटर’वर धाड घालून ६ जणांना अटक केली आहे. सुरजकुमार सिंह, नविनकुमार राम, सागर राम, मुरली केवट, अमरकुमार राम, घिरनकुमार पांडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ भ्रमणभाषसंच, ७ व्हाईसचेंजर (आवाजामध्ये पालट करणारे ) भ्रमणभाष, ४० सीमकार्ड, १४ डेबीट कार्ड, ८ आधारकार्ड, पॅनकार्ड असा ४ लाख ८४ सहस्र रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीकडून आर्थिक फसवणूक केलेल्या किरण दातीर यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे अन्वेषण करतांना या टोळीची कुकृत्ये उघडकीस आली.