‘सनातन संस्थेच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांचे पुणे येथील घर, म्हणजे आमच्यासाठी साधना, आधार आणि श्रद्धा यांचे स्थान होते. आमच्या लग्नापासून (वर्ष २००७ पासून) ते पुढे चि. कु. श्रिया (आताचे वय १३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि चि. पू. वामन (आताचे वय ५ वर्षे) यांच्या जन्मानंतर आमच्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या अन् महत्त्वाच्या क्षणी आम्हाला पू. दातेआजी यांचे आशीर्वाद लाभले आहेत. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पू. निर्मला दातेआजी यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. प्रीती : पू. आजी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात निवासाला आल्यापासून मी त्यांना नेहमी भेटायला जाते. तेव्हा पू. आजी अगदी सहजतेने माझा हात हातात घेतात. त्या वेळी मला त्यांच्या हाताचा स्पर्श कापसाप्रमाणे मऊ जाणवतो. पू. आजी अतिशय प्रेमाने माझी विचारपूस करतात.
१ आ. अखंड अनुसंधानात असणे : ‘मागील काही मासांपासून पू. आजींची दृष्टी निर्गुणाकडे लागली आहे आणि त्या सतत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवते. त्यांच्या डोळ्यांकडे बघितल्यावर ‘मी त्यांच्या डोळ्यांतून आत पांढर्या प्रकाशात गेले आहे’, असे मला जाणवते. त्यांच्या जवळ गेल्यावर त्या आपल्यालाही त्यांच्या अनुसंधानात जोडून घेतात. त्यांची वाटचाल निर्गुणाकडे होत आहे.
२. पू. आजींच्या सत्संगात साधिकेचे मन निर्विचार होणे
पू. आजींच्या चैतन्यामुळे त्यांच्या सत्संगात असतांना माझे मन निर्विचार होते. मला शांत आणि स्थिर वाटते. ‘त्यांच्याशी काही न बोलता त्यांच्या सत्संगात रहावे’, असे मला वाटते.
३. ‘पू. आजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी एकरूप होत आहेत’, असे साधिकेला वाटणे
पू. आजींना बरे वाटत नसले किंवा त्यांना विस्मरण होत असले, तरीही त्या माझी मुलगी कु. श्रियाजवळ माझी आठवण काढतात. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच माझी आठवण काढत आहेत’, असे मला जाणवते. मी याविषयी पू. वामन यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘पू. दातेआजी म्हणजे नारायण आहेत ना ! म्हणजे नारायणच तुझी आठवण काढतात, असे आहे.’’ पू. आजींकडे बघितल्यावर त्यांचे रूप हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांसारखेच जाणवते. ‘पू. आजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी एकरूप होत आहेत’, असे मला वाटते.
आम्हाला पू. आजींसारख्या उच्च कोटीच्या संतांचा सत्संग लाभणे, ही आमच्यावर गुरुकृपा आहे. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (६.६.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |