काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ४ सरकारी कर्मचारी बडतर्फ !

५ वर्षांत ५५ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई !

श्रीनगर – काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना शस्त्रे पुरवण्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ४ सरकारी कर्मचार्‍यांना बडतर्फ केले. यामध्ये अब्दुल रहमान दार आणि गुलाम रसूल बट हे २ हवालदार, तसेच जलशक्ती विभागातील कर्मचारी अनायतुल्ला शाह पीरजादा आणि सरकारी शिक्षक शब्बीर अहमद वाणी यांचा समावेश आहे. आतंकवादी अन् फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभगी असल्याच्या कारणावरून गेल्या ५ वर्षांत ५५ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

१. बडतर्फ करण्यात आलेले हवालदार अब्दुल रहमान दार आणि गुलाम रसूल बट हे दोघेही पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी आहेत. हे दोघेही आतंकवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि सुरक्षादलाचे गणवेश पुरवत होते.

२. कुलगामचा रहिवासी असलेला शब्बीर अहमद वाणी हा बंदी घातलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’चा सक्रीय सदस्य असूनही त्याची शिक्षण विभागात शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्याचा हिजबुल मुजाहिद्दीनशीही संबंध होता. दक्षिण काश्मीरमध्ये आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’ला बळकटी देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आतंकवादी बुरहान वाणी याला मारल्यानंतर कुलगाम आणि शोपिया येथे  झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो शाळेतील विद्यार्थ्यांना जिहादी भाषणे देऊन त्यांना चिथावणी देत होता.

३. बारामुल्ला येथील रहिवासी अनायतुल्ला शाह पीरजादा हा साहायक लाइनमनचे काम करत होता. तो ‘अल् बद्र मुजाहिद्दीन’ या बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेचा भूमिगत झालेला कार्यकर्ता आहे.

 

संपादकीय भूमिका

अशांची भरती करणार्‍या आणि त्यांना एवढे दिवस पदावर राहू देणार्‍या संबंधितांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !